‘राज्यपालांची हकालपट्टी करा’; गडकरी, फडणवीसांच्या नागपुरातील माजी भाजप आमदाराची मागणी…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या वक्तव्यामुळे विरोधकांनी राज्यपालांसह भाजपला धारेवर धरलं आहे.
अनेक राजकीय नेत्यांनी राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. अशात आता भाजपचेच काही नेतेही राज्यपालांच्या विधानामुळे त्यांना पदावरुन काढून टाकण्याची मागणी करत असल्याचं चित्र आहे.
आता भाजपमधूनही राज्यपाल हटावची मोहिम सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करा.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर निघायला पाहिजे’, अशी मागणी गडकरी, फडणवीसांच्या नागपूर जिल्ह्यातील भाजपच्या माजी आमदारानेच केली आहे. भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी राज्यपालांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. 2014 ला छत्रपती शिवरायांची साथ घेवूनच मोदीजी पंतप्रधान झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान सहन करणार नाही, असं रेड्डी यावेळी म्हणाले.
उदयनराजेंचाही राज्यपालांवर हल्लाबोल –
याआधी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. मी कुठल्याही पक्षात असलो तरी राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांची हकालपट्टी झाली पाहिजे, ही माझी मागणी आहे. शिवरायांचं विचार जुना झाला हे कोश्यारींचं वक्तव्य ऐकल्यानंतर मला तीव्र संताप आला. त्यांच्या वक्तव्याचं आश्चर्य वाटलं. याधीही त्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये केली आहेत, असं ते म्हणाले. राज्यपाल कोश्यारींना पदावरुन मुक्त करावे, अशी मागणी उदयनराजेंनी केली.