व्यवसायकर दात्यांसाठी “अॅम्नेस्टी स्कीम ” जाहिर
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 09 मार्च :- महाराष्ट्र शासनाने व्यवसायकर कायदा 1975 अंतर्गत दि 25 फेब्रुवारी 2022 रोजी जारी केलेल्या अधिसुचनेनुसार व्यवसायकर दात्यांसाठी नविन विलंब शुल्क (Late fee) माफी योजना जाहीर केली आहे. कर व विवरणपत्र नियमित कालावधीत जमा करणे गरजेचे असते अन्यथा 30 दिवसांपर्यंतच्या उशीरासाठी दोनशे रुपये व त्यानंतरच्या विलंबासाठी एक हजार रूपये विलंब शुल्क आकारले जाते. परंतू व्यवसायाच्या धावपळीत ज्यांचा कर व विवरणपत्र भरणा बाकी आहे अशा व्यावसायिकांकरता “विलंब शुल्क माफी योजना ” जाहिर करण्यात आलेली आहे. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंतच्या कालावधीकरिता प्रलंबित असलेली आपली सर्व विवरणपत्रे, फक्त कर व व्याज भरून कोणतेही विलंब शुल्क न भरता ३१ मार्च २०२१ पूर्वी जमा करता येणार आहेत.
या योजनेची सर्व माहीती www.mahagst.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक व करदात्यांनी या संधीचा लाभ घ्यावा व अधिक माहितीकरीता व्यवसाय कर कार्यालय, यवतमाळ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन व्यवसाय कर अधिकारी शिल्पा पाटील यांनी केले आहे.