राज्यपालांच्या भाषणा वेळी “जय भवानी जय शिवाजी” च्या घोषणा ; राज्यपाल अभिभाषण न करता निघून गेले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भाषणाने अधिवेशनाला सुरुवात झाली. मात्र, राज्यपाल बोलायला उभं राहिल्यानंतर शिवसेनेकडून जोरदार घोषणाबाजी झाली.
जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा सुरुवातीला दिल्या गेल्या. नंतर गोंधळ, घोषणाबाजी सुरू झाली. त्यातच आपलं भाषण सुरू ठेवण्याचा राज्यपालांनी प्रयत्न केला. मात्र, नंतर ते निघून गेले.
त्यानंतर अधिवेशनाचं थेट प्रक्षेपण बंद करण्यात आलं.
औरंगाबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपालांनी शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्यातील गुरू शिष्यांच्या नात्याबद्दल विधान केलं होतं. चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पुछेगा, समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा, गुरू का बडा महत्त्व होता है, असं विधान त्यांनी केलं होतं. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी बाकांवरून ही घोषणाबाजी झाली.
मलिकांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक
दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या नेत्यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली आहे.
“दाऊद समर्थकांचा राजीनामा जोवर होत नाही, तोवर आमचा संघर्ष सुरूच राहिल,” असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे.
तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनासाठी विधीमंडळात पोहचले आहेत.

3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. तर, 11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येतील असं चित्र आहे.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने केलेल्या अटकेनंतर त्यांच्या राजीनाम्याचा मुद्दा अधिवेशनात गाजू शकतो.
हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकदाही सभागृहात उपस्थित राहिले नव्हते. अर्थात, उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीचं कारण त्यामागे होतं. पण त्यांच्या उपस्थितीबद्दल कुतूहल आणि ते केव्हा हजेरी लावणार हा प्रश्न दर काही वेळानं विचारला जात होता.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेलाही मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती होती. त्यामुळे उद्धव ठाकरे हे या अधिवेशनात कितीकाळ उपस्थित राहतील, याकडे सर्वांचं लक्ष असेल.
नवाब मलिकांच्या अटकेसोबतच केंद्रीय यंत्रणांचा वापर, भाजप नेते किरीट सोमय्यांवर झालेले आरोप, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नीतेश राणे यांच्यावरील कारवाई या मुद्द्यांवरही अधिवेशनात गोंधळ होऊ शकतो.
राज्यातील वीजेचा प्रश्न, ओबीसी आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे मुद्देही या अधिवेशनात गाजतील.
या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड होणार का, याकडेही सर्वांचं लक्ष असेल. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभेचं अध्यक्षपद रिक्त आहे.
दरम्यान, अधिवेशनाच्या आदल्या दिवशी, म्हणजे बुधवारी (2 मार्च) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..