राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे :- छत्रपति उदयनराजे यांच्या गंभीर इशारा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. आता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे, ज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरच छत्रपती उदयनराजे यांनी राज्यपालांना गंभीर इशारा दिला आहे.
उदयनराजे नेमकं काय म्हणाले?
“राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरू होते असे वक्तव्य करून शिवप्रेमीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे.”, असे ट्वीट खासदार छत्रपती उदयनराजे यांनी केले आहे.
राज्यपाल काय म्हणाले होते?
औरंगाबाद येथे मराठी भाषा दिन व दासनवमीनिमित्त समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलत असतांना राज्यपालांनी समर्थ रामदास स्वामींशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल, असे खळबळजनक वक्तव्य केले.
चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, आणि समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे त्यांच्या आईचे मोठे योगदान असते, तसंच आपल्या समाजात गुरूचे मोठे स्थान असते. तसेच शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले होते की, तुमच्या कृपेने मला राज्य मिळाले आहे, असे राज्यपाल म्हणाले होते.
राज्यपालांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध
महाराष्ट्राचे राज्यपाल कोशारी यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात छ्त्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत रामदास स्वामीच्या अनुषंगाने वादग्रस्त विधान केले होते. याचा निषेध म्हणुन बहुजन समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्यपाल कोशारी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला. तसेच उस्मानाबाद पोलीसात कायदेशिर गुन्हा दाखल करणार असुन यापुढे छत्रपतीचा अपमान सहन करणार नाही असा इशारा दिला.