उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज होणार मतदान…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी रविवार २० फेब्रुवारी २०२२ रोजी मतदान होणार आहे.
उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. यातील तिसऱ्या टप्प्याचे मतदान रविवारी २० फेब्रुवारी रोजी होईल. पंजाबमध्ये १४ फेब्रुवारी रोजी एका टप्प्यात मतदान होणार होते. पण विशेष परिस्थिती म्हणून निवडणूक आयोगाने १४ ऐवजी २० फेब्रुवारी रोजी एका टप्प्यात मतदान घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी रविवारी निवडणूक प्रक्रिया पार पाडून केली जाईल.
दरवर्षी धार्मिक यात्रेच्या निमित्ताने पंजाबमधील नागरिक विशिष्ट कालावधीत उत्तर प्रदेशमधील तीर्थक्षेत्राला भेट देतात. ही पंजाबमधील एक मोठी धार्मिक यात्रा आहे. याच यात्रेचे कारण पुढे करून पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांनी निवडणूक आयोगाला १४ फेब्रुवारीचे मतदान पुढे ढकलण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या विनंती पत्राला पंजाबमध्ये निवडणूक लढवत असलेल्या कोणत्याही पक्षाने हरकत घेतली नाही. यानंतर निवडणूक आयोगाने विशेष परिस्थिती म्हणून १४ ऐवजी २० फेब्रुवारी रोजी एका टप्प्यात मतदान घेण्याचा निर्णय घेतला.
उत्तर प्रदेशमध्ये अठराव्या विधानसभेच्या स्थापनेसाठी तिसऱ्या टप्प्यात १६ जिल्ह्यांतील ५९ जागांसाठी मतदान होणार आहे. तसेच पंजाबमध्ये विधानसभेच्या सर्व म्हणजेच ११७ जागांसाठी मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशच्या ५९ जागांसाठी ६२७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवारांचे भवितव्य २.१६ कोटी मतदार ठरवतील. तर पंजाबमधील ११७ जागांवर निवडणूक लढत असलेल्या १३०४ उमेदवारांचे भवितव्य २ कोटी १४ लाख ९९ हजार ८०४ मतदार ठरवतील.
उत्तर प्रदेशमध्ये हाथरस, फिरोझाबाद, एटा, कासगंज, मैनपुरी, फर्रूखाबाद, कन्नौज, इटावा, औरैया, कानपुर देहात, कानपुर नगर, जालौन, झांसी, ललितपुर, हमीरपुर, महोबा या जिल्ह्यांतील ५९ जागांवर मतदान होणार आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि केंद्रीयमंत्री एसपी सिंह बघेल करहल मतदारसंघातून एकमेकांविरोधात या टप्प्यात निवडणूक लढवत आहेत. योगी सरकारचे औद्योगिक विकासमंत्री सतीश महाना कानपुरच्या महराजपुर, अबकारी मंत्री राम नरेश अग्निहोत्री मैनपुरीतील भोगांवमधून, उच्च शिक्षण राज्यमंत्री नीलिमा कटियार कल्याणपुरमधून निवडणूक लढवत आहे. शिवपाल सिंह यादव जसवंतनगरमधून निवडणूक लढवत आहेत.
सिरसागंजमधून मुलायम सिंह यादव यांचे व्याही हरीओम यादव भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. फर्रूखाबादमधून काँग्रेसच्या तिकिटावर सलमान खुर्शीद यांची पत्नी लुईस खुर्शीद निवडणूक लढवत आहे. आयपीएस पदाचा राजीनामा देऊन भाजपच्या तिकिटावरून असीम अरुण कन्नौजमधून निवडणूक लढवत आहेत.
पंजाबमध्ये आम आदमी पार्टी आणि संयुक्त समाज मोर्चा हे दोन पक्ष राज्यातील सर्व ११७ विधानसभेच्या जागांवर निवडणूक लढवित आहेत. शिरोमणी अकाली दल (बादल गट) ९७ तर त्यांच्या सोबत असलेला बहुजन समाज पक्ष २० जागांवर निवडणूक लढवत आहे. भाजप ६८ जागांवर आणि त्यांच्या सोबत असलेला पंजाब लोक काँग्रेस ३४ तर शिरोमणी अकाली दल (संयुक्त) १५ जागांवर निवडणूक लढवत आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..