प्रकल्पबाधित गावांच्या पुनर्वसनाची कामे वेळेत पूर्ण करा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे निर्देश ; कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना मदत देण्यात जिल्हा राज्यात प्रथम असल्याबाबत केले कौतुक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि 4 फेब्रु :- सिंचन प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या गावांच्या पुनर्वसनाची कामे दर्जेदार होण्यासोबतच ती दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेत. पूरबाधित गावांचे पुनर्वसन, कोविड लसीकरण आणि कोविडमुळे मृत्यू झालेल्याच्या वारसांना अर्थसहाय्य इत्यादी बाबींचा आढावा त्यांनी आज घेतला, यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे झालेल्या आढावा बैठकीला आमदार तथा वक्फ बोर्डाचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, जिल्हाधिकारी अमोल येडगे, माजी आमदार विजय खडसे, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे उपस्थित होते.
बेंबळा प्रकल्पातील बुडीत क्षेत्रातील 20 गावांच्या पुनर्वसनापैकी 17 गावांचे पुनर्वसन झाले आहे. मात्र दर्जेदार नागरी सुविधा निर्मितीसाठी निधी उपलब्ध असतानाही काम अपूर्ण असल्याबाबत श्री वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली. सदर नागरी सुविधांची कामे दोन महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. यावेळी कोहळ लघु पाटबंधारे योजना, बेंबळा, अरुणावती, टाकळी- डोल्हारी मध्यम प्रकल्प, अमडापुर लघु प्रकल्प, निम्न पैनगंगा, खर्डा लघु प्रकल्प इत्यादी प्रकल्पाच्या पुनर्वसनाचा आढावा घेतला. टाकळी- डोल्हारी मध्यम प्रकल्पातील उदापुर, अमडापुर लघु प्रकल्पातील कुरळी, घमापूर या तीन गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्याच्या सूचना श्री वडेट्टीवार यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यात पूर आणि गारपिटीमुळे झालेले नुकसान आणि भरपाईबाबत आढावा घेतांना वर्षभरात वीज पडून 21 व्यक्तींचा मृत्यू झाल्याबाबत त्यांनी दुःख व्यक्त केले. असे मृत्यू टाळण्यासाठी प्रत्येक गावात वीज अटकाव यंत्र बसविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्यात. तसेच मंडळ निहाय वीज अटकाव यंत्र बसविण्यासाठी प्रलंबित 3 कोटी 18 लक्ष निधी आणि नुकसान भरपाई साठीचा 82 कोटी 31 लक्ष रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
जिल्ह्यातील विजाभज आश्रमशाळांचा आढावाही श्री वडेट्टीवार यांनी घेतला. जिल्ह्यात 78 आश्रमशाळांपैकी ‘अ’ दर्जाच्या आश्रमशाळांमध्ये डिजिटल क्लासरूम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगून ‘अ’ दर्जाच्या शाळांची यादी पाठविण्याचे निर्देश दिलेत.
कोविड बाबत आढावा घेताना त्यांनी कोविडमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सुनियोजनामुळे शासनामार्फत आतापर्यंत जिल्ह्यातील 1334 प्रकरणात मदत निधीची मंजूर देण्यात आली आहे. यासाठी जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याबाबत वडेट्टीवार यांनी प्रशासनाचे कौतुक केले.
बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.