तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) भेंट घेणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेची….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई/हैदराबाद :- देशातील नेतृत्वात गुणात्मक बदल होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी भाजपविरोधात देशपातळीवर आघाडी उघडण्यासाठी अधिक वेगाने काम करायला हवे. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा झाली आहे.
लवकरच यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत जाऊन भेट घेऊ, असे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी आज सांगितले.
केंद्र सरकारच्या गैरभाजपशासित राज्यांविरोधातील धोरणाबाबत देशभरातून नाराजी व्यक्त होत आहे. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भाजपला पर्याय म्हणून देशात तिसरी आघाडी उभी करण्याचे सूतोवाच केले होते. ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्रात येऊन शिवसेना नेते पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांचीही भेट घेतली होती. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनीही तसेच वक्तव्य करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीची इच्छा व्यक्त केली आहे.
देशातील समविचारी नेत्यांना एकत्र करणार
देशातील स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी निवृत्त आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकाऱयांची हैदराबादमध्ये बैठक आयोजित केली जाणार आहे. भाजपशी लढण्यासाठी देशातील समविचारी नेत्यांना एकत्र आणणार. देशासाठी जे काही करण्याची गरज आहे ते सर्व करणार. पंतप्रधान बनण्यासाठी नव्हेतर देशात बदल घडवण्यासाठी लढत राहणार, असा इशारा केसीआर यांनी भाजपला दिला आहे.
आघाडीच्या हालचाली
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याच्या केसीआर यांच्या वक्तव्यावर बोलताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही गेल्या महिनाभरापासून काम करत आहोत आणि 2024 च्या निवडणुका एकत्र लढण्यासाठी सर्व विरोधकांची स्वतंत्र आघाडी तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे संजय राऊत म्हणाले.