योगी आदित्यनाथांना काळे झेंडे दाखविणाऱ्या तरूणीला अखिलेश यादवांचे मोठे बक्षीस ; थेट विधानसभेची दिली उमेदवारी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या पूजा शुक्ला या तरुणीला अखिलेश यादव यांनी मोठे बक्षीस दिले आहे.
समाजवादी पक्षातर्फे थेट लखनऊ उत्तर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे ब्राह्मण समाजात मोठा दबदबा असलेल्या अभिषेक मिश्रा यांचे तिकीट कापून पूजा शुक्ला यांना तिकीट दिले आहे.
लखनौ उत्तर ही जागा जागा सध्या भाजपाच्या ताब्यात आहे. लखनऊ विद्यापीठातील डाव्या संघटनेतून विद्यार्थी नेत्या म्हणून राजकीय प्रवासाला सुरुवात करणाºया पूजा शुक्ला यांना समाजवादी पाटीर्ने लखनऊच्या उत्तरेकडील मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
२०१७ मध्ये भाजपा सरकार स्थापन झाल्यानंतर पूजा शुक्ला यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लखनऊ विद्यापीठात जाताना काळे झेंडे दाखवले होते, त्यामुळे तिला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले होते. पूजा शुक्ला यांना २६ दिवस तुरुंगात राहावे लागले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लखनऊ विद्यापीठात महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार होते. त्यावेळी हसनगंज, लखनऊ विद्यापीठाआधी हनुमान सेतू मंदिराजवळ पोलीस स्टेशनसमोर समाजवादी पार्टीच्या विद्यार्थी सभेच्या नेत्या पूजा शुक्ला यांच्यासह काही विद्यार्थ्यांनी काळे झेंडे दाखवले होते. यादरम्यान 12 विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले होते.
पूजा शुक्ला यांना झेंडा दाखवणे त्यावेळी चांगलेच महागात पडले होते. लखनऊ विद्यापीठाचे नवीन सत्र सुरू असताना पूजा शुक्ला यांना अर्ज रद्द करावा लागला होता. त्यांना प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे पूजा शुक्ला यांनी लखनऊ विद्यापीठात तब्बल दोन महिने संप पुकारला होता.
सध्या त्या समाजवादी विद्यार्थी सभेच्या माजी राष्ट्रीय उपाध्यक्षा आहेत. सरकारच्या धोरणांबाबत पूजा शुक्ला सतत आंदोलन करत असून यादरम्यान अनेक वेळा पोलिसांच्या लाठीचार्जमध्येही त्यांना दुखापत झाली आहे.