हिंगोलीत कॉंग्रेसच्या बैठकीत गोंधळ ; जबाबदारी वाटपावरुन दोन गटांत घोषणाबाजी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिंगोली :- जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात रविवारी (ता.३०) आयोजन करण्यात आलेल्या बैठकीत दोन गटातील समर्थक आमने-सामने भिडले. यावेळी पक्ष निरीक्षकांच्या समोर प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून निरीक्षकांनी बैठकीतून काढता पाय घेतला. त्यानंतर जिल्ह्याचे सहनिरीक्षक यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत वरिष्ठांपर्यंत कळविण्याचे आश्वासन दिले. काँग्रेस पक्षाच्या वतीने डिजिटल सदस्यता नोंदणी संदर्भात पक्षाचे निरीक्षक बाळासाहेब देशमुख रविवारी हिंगोली (Hingoli)जिल्हा दौऱ्यावर आले होते. दुपारी एक वाजता जिल्हा काँग्रेस (Congress Party) कमिटी कार्यालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी निरीक्षक श्री.देशमुख यांनी गोरेगावकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी गोरेगावकर यांच्या निवासस्थानी जमलेल्या गोरेगावकर समर्थकांनी सातव गटाकडून होत असलेल्या अन्यायाबाबत देशमुख यांच्यासमोर भावना व्यक्त केल्या. दरम्यान पक्ष कार्यालयावर जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, माजी आमदार संतोष टारफे (Santosh Tarafe) यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीच्या प्रतिक्षेत होते.
दुपारी तीन वाजता पक्ष निरीक्षक बाळासाहेब देशमुख व सहनिरीक्षक लक्ष्मण रापतवार यांचे बैठकस्थळी आगमन झाले. यावेळी काही गोरेगावकर समर्थक कार्यकर्त्यांनी आवाज येत नसल्याच्या कारणावरून बोलण्यास सुरुवात केली. याच दरम्यान संतप्त झालेल्या सातव समर्थकांनी निरीक्षक देशमुख यांना चांगलेच धारेवर धरले. गोंधळ वाढत गेल्यानंतर काही समर्थकांनी बाळासाहेब देशमुख यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. गोंधळ कार्यालयाच्या बाहेर पोहोचल्यानंतर गोरेगावकर समर्थक विरुद्ध सातव समर्थक यांच्यात बराच काळ घोषणाबाजी सुरू होती. गोंधळ लक्षात घेता पक्ष निरीक्षक बाळासाहेब देशमुख यांनी बैठक स्थळावरून काढता पाय घेतला.
यानंतर सहप्रभारी लक्ष्मण रापतवार यांच्यासमोर सातव समर्थक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना पक्ष निरीक्षक बाळासाहेब देशमुख यांना निलंबित करण्यात यावे ही मागणी वरिष्ठ नेत्यापर्यंत पोहोचविण्याची विनंती केली. झालेल्या या प्रकारामुळे काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्याचबरोबर येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील हा वाद आणखी कोणत्या थराला जाईल याकडे राजकीय लक्ष लागले आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….