एसटी महामंडळाकडून चालक भरतीबाबत मोठा निर्णय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मागील अनेक दिवसांपासून राज्यात सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही मिटलेला नाही. त्यामुळे आता एसटी महामंडाळाने प्रवाशांना एसटी सेवा मिळावी हा हेतू असल्याचं सांगत मोठा निर्णय घेतलाय.
या निर्णयानुसार महामंडळ चालक म्हणून ७५० खासगी चालकांना कामावर दाखल करून घेत आहे. याशिवाय महामंडळाने कामावर हजर न होणाऱ्या आणि संपावर ठाम असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई सुरूच ठेवली आहे. याचीही आकडेवारी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी स्वतः माध्यमांसमोर ठेवली. तसेच बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेता येत नाही, असं नमूद करत संपावर ठाम असणाऱ्या कामगारांना इशारा दिलाय.
शेखर चन्ने म्हणाले, “एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले, तर त्यांच्यावर कारवाई करणार नाही. ७५० खासगी चालक कंत्राटी पद्धतीने घेण्यात येत आहेत. जे सेवानिवृत्त झाले आहेत, ज्यांचे वय ६२ पेक्षा कमी आहे, जे फिट आहेत त्यांना काही काळ कामासाठी घेणार आहोत. एसटी सेवा प्रवाशांना मिळावी हा खासगी चालक कंत्राटी पद्धतीने घेण्यामागचा हेतू आहे.”