ड्रायव्हर पाठवत होता विद्यार्थिचे नाव , हॉलतिकीट ; सुपेंचा ड्रायव्हरसह आणखी एकाला अटक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात तुकाराम सुपे याच्या कार्यालयीन गाडीवर चालक म्हणून काम करणार्या सुनिल घोलप यासह मनोज शिवाजी डोंगरे यास सायबर पोलिसांनी अटक केली.
यामध्ये, सुपे याने पाठविलेली विद्यार्थ्यांची नावे व हॉलतिकिट अन्य आरोपींना पाठविण्याचे काम घोलप करत असल्याचे पोलिस तपासात समोर आल्याची माहिती सहाय्यक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयाला दिली. न्यायालयाने त्यांना 3 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता युक्तिवादादरम्यान अॅड. जाधव म्हणाले, सुपे यांच्या कार्यालयीन गाडीवर चालक म्हणून काम करणार्या घोलप याने 2020 मधील शिक्षक पात्रता परिक्षेमध्ये अन्य आरोपींशी संगनमत करून अपात्र विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी त्यांकडून कोट्यवधी रुपये घेतले आहे. सुपे हा त्याच्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांची नावे त्यांचे हॉल तिकीट घोलप याच्या व्हॉटस्अपवर पाठवित. त्यानंतर घोलप ते अन्य साथीदाराला पाठवित असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे, घोलप याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून व्हॉटस्अप चॅटिंग बाबत पुरावा हस्तगत करायचा आहे. घोलप याने स्वतंत्ररित्या विद्यार्थ्यांची नावे त्याच्या साथीदाराला पाठविली आहेत. तर, डोंगरे हा सुपे व सावरीकर या दोघांच्या संपर्कात होता. याप्रकरणात त्याला तीन लाख पंचवीस हजार रुपये मिळाल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी अॅड. जाधव यांनी केली.
दरम्यान, पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने तुकाराम सुपे व अभिषेक सावरीकर यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची मागणी करताना सरकारी वकील विजयसिंह जाधव म्हणाले, गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून गुन्हयाचा तपास सुरू आहे. आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेले मोबाईल, लॅपटॉप यांचे तांत्रिक विश्लेषण करून डिजीटल पुरावा मिळवायचा आहे. आरोपींविरोधात आणखी पुरावे मिळवून त्यांविरोधात दोषारोपपत्र दाखल करायचे असल्याचे अॅड. जाधव यांनी सांगितले. बचावपक्षातर्फे अॅड. मिलींद पवार, अॅड. योगेश पवार, अॅड. विश्वास खराबे हे काम पाहत आहे