मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा मेसेज व्हायरल ; बाळा नांदगावकर म्हणाले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणुकांच्या तयारीसाठी महाराष्ट्रभर दौरे करत असतानाच पुणे दौऱ्यापूर्वी पक्षाला मोठा झटका बसला आहे. पुण्यातील मनसेच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थित रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. रुपाली पाटील यांच्या राजीनाम्यानंतर मनसेला पुण्यामध्ये मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर आता मनसेचा आणखी एक मोठा नेता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
रुपाली पाटील यांच्यानंतर राज ठाकरेंसोबत सावलीप्रमाणे असणारे बाळा नांदगावर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. रुपाली पाटील यांच्या राजीनाम्यानंतर बाळा नांदगावर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता राज ठाकरेंनी आणखी एक मोठा धक्का बसणार का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
मनसे नेते बाळा नांदगावर हे राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. त्यामुळे सुरु असलेल्या या चर्चांबाबत लोकसत्ता ऑनलाईसोबत बोलताना त्यांनी या प्रकरणी भाष्य केले आहे. पुण्याच्या दौऱ्याला गेलो नसल्याने बाळा नांदगावकर स्वगृही परतणार अशा बातम्या आणि काही मेसेज फिरत आहेत अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
“कोणामध्ये बदल घडत नसेल तर..”; मनसेतील राजीनाम्यानंतर रुपाली पाटील यांची प्रतिक्रिया
“मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नाशिक, औरंगाबाद आणि पुणे दौरा सुरू आहे. नाशिक आणि औरंगाबाद दौऱ्यादरम्यान मी राज ठाकरे यांच्या सोबत होतो. पुण्याला जेव्हा राज ठाकरे आले तेव्हा मी मुंबईला परतलो. मुंबईत १८ तारखेला माझ्या मतदार संघात कार्यालयाचे उदघाटन साहेबांच्या हस्ते असल्याने मी तयारीसाठी मुंबईत आलो आहे. मी पुण्याच्या दौऱ्याला गेलो नसल्याने बाळा नांदगावकर स्वगृही परतणार अशा बातम्या आणि काही मेसेज फिरत आहेत,” अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
दरम्यान, याआधी आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांसाठी मनसे आणि भाजपा युती होईल का याबाबत बाळा नांदगावकर यांनी भाष्य केलं होतं. आगामी निवडणुकांमध्ये मनसे आणि भाजपची युती होणार का? या प्रश्नावर बाळा नांदगावकर यांनी, एकला चलो यामधून आम्ही निवडणूका लढवल्या आहेत. मात्र तुर्तास तरी भाजपा सोबत युती बाबत कोणतीही चर्चा नाही, असे म्हटले होते. बाळा नांदगावकर यांनी ही प्रतिक्रिया दिल्यानंतर ‘तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळेल’ असे विधान केले होते.