शासकीय आश्रमशाळेत कौशल्य विकास कार्यक्रम लागू करावा :- शेतकरी स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 14 डिसेंबर :- जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना बदलत्या काळाप्रमाणे तांत्रिक क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण व्हाव्या यासाठी सर्व शासकीय आश्रमशाळेत कौशल्य विकास कार्यक्रम लागू करावा, यासाठी आवश्यक ती मदत करण्यास आपण तत्पर आहोत. तसेच खाजगी अनुदानीत आश्रमशाळांची तपासणी करून बोगस विद्यार्थी पटसंख्या दाखवणाऱ्या आश्रमशाळांवर कारवाई करावी, अशा सूचना कै. वसंतराव नाईक, शेतकरी स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केल्या.
यवतमाळ येथे आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत श्री. किशोर तिवारी यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, पांढरकवडा वनविभागाचे उपवनसंरक्षक किरण जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा खनिकर्म अधिकारी ओंकार सिंग भोंड, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण, सहाय्यक निबंधक राजेश गुजर प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलतांना श्री. किशोर तिवारी यांनी बाबाजी दाते महिला नागरी बँक प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे विभागाच्या विशेष चौकशी पथकाद्वारे करण्याची मागणी केली. तसेच वणी, मारेगाव व झरी या भागातील अनियंत्रित खनिज उत्खननाची तपासणी करण्याचे व शासनाने जप्त केलेली रेती घरकुल योजनेसाठी मोफत उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी सांगितले. मजूर सहकारी संस्थांचा कामाचे ऑडिट रिपोर्ट व मजुराची यादी बद्दल आढावा घेतांना मजूर संस्थांच्या नावाने शासनाची कामे घेणाऱ्या बोगस कंत्राटदाराची चौकशी करून त्यांचेवर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
शेतकरी स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष श्री. तिवारी यांनी यावेळी पांढरकवडा येथील टोल नाका तात्काळ बंद करणे, रेती चोरी रोखणे, मटका व अवैध धंदे यावर प्रतिबंध लावणे, नगर परिषद व महसूलचे अधिकारी यांची रिक्त पदे भरणे, पांढरकवडा वनविभागात वाघ व वन्यप्राण्यांपासून सुरक्षीततेसाठी कुंपण लावणे, अभयारण्याच्या आतील गावात पाण्याची सोय करणे आदि विषयांचा आढावा घेवून अनुषंगीक सूचना व निर्देश दिले.
बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.