दिल्लीमध्ये पवार साहेबांनी महाराष्ट्राचे सोडून 100 कार्यकर्ते दाखवावे :- भाजप नेते निलेश राणे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 81 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी पक्षातर्फे आपल्या अध्यक्षांचा वाढदिवस धुमधाममध्ये नेहरू सेंटर येथे साजरा करण्यात आला आहे.
यावेळी अनेक नेत्यांनी आपली भाषणं केली. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या भाषणावर भाजपे नेते निलेश राणे यांनी जहरी टीका केली आहे.
अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्या पंतप्रधान बनण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे लागतील असं वक्तव्य केलं होतं. गुजरातमध्ये 26 खासदार असताना त्यांचा पंतप्रधान होतो मग आपला का नाही असा सवाल त्यानी विचारला होता. यावर निलेश राणे यांनी आपल्या खास शैलीत राष्ट्रवादी पक्षावर टीका केली आहे.
पवार साहेब राजकारणात इतर पक्षांची मदत घेतल्याशिवाय स्वतःच्या पक्षाच्या जीवावर काही करू शकत नाही. पवार साहेबांच नेतृत्व महाराष्ट्रात फक्त साडेतीन जिल्ह्यात आहे त्यात पण पूर्ण 100 टक्के नाही. दिल्लीमध्ये पवार साहेबांनी महाराष्ट्राचे सोडून 100 कार्यकर्ते दाखवावे, असं आव्हान राणे यांनी शरद पवार यांना दिलं आहे.
दरम्यान, निलेश राणे हे आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जातात. याअगोदरही राणे यांनी राष्ट्रवादीला मर्यादित खासदारांचा पक्ष असं म्हटलं होतं. परिणामी या टीकेवर राष्ट्रवादीकडून काय उत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.