आदिवासी विकास विभागात तुकाराम मुंडे यांची तातडीने नियुक्ती करा :- बिरसा ब्रिगेडची मागणी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- राज्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण, शाश्वत व परिणामकारक विकासासाठी आदिवासी विकास विभागात तातडीने प्रशासकीय सुधारणा करण्याची आवश्यकता असून, त्यासाठी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे मा. तुकाराम मुंडे यांची आयुक्त, आदिवासी विकास विभागात तातडीने नियुक्ती करावी, अशी ठाम मागणी बिरसा ब्रिगेड या तळागाळात कार्यरत आदिवासी सामाजिक संघटनेने केली आहे.
बिरसा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गाव–वस्ती–पाडा पातळीवर संघटनेचे व्यापक जाळे असून आदिवासी समाजाशी थेट संपर्कातून विभागाच्या कार्यपद्धतीबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. शैक्षणिक वर्ष अर्ध्यावर येऊनही पात्र विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश मिळत नाही, अनेक कल्याणकारी योजना प्रत्यक्ष अंमलबजावणीऐवजी केवळ कागदोपत्री मर्यादित आहेत, तसेच आदिवासी युवकांसाठी रोजगारनिर्मितीबाबत ठोस व कालबद्ध धोरणाचा अभाव दिसून येतो.
संघटनेनुसार, आदिवासी विकास विभागातील निधी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर अखर्चित राहतो. यामागे योजनांची वेळेत व प्रभावी अंमलबजावणी न होणे हे प्रमुख कारण आहे. आश्रमशाळा व वसतिगृहांमधील प्रशासकीय कारभार पारदर्शक नसून, काही ठिकाणी शिस्तभंग व जबाबदारी झटकण्याची मानसिकता प्रकर्षाने जाणवते.
याशिवाय, बिरसा ब्रिगेडच्या आंदोलनात्मक निवेदनाची दखल घेऊन महागाव येथे इयत्ता १ ते ७ शाळेस प्रशासकीय मान्यता मिळूनही ती अद्याप सुरू न झाल्याने स्थानिक आदिवासी समाजाचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मुलींच्या आश्रमशाळा व वसतिगृहांमधील लैंगिक अत्याचार व पिळवणुकीच्या घटनांवर ठोस कारवाई न झाल्याने दोषींना अप्रत्यक्ष प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.
या सर्व बाबींचे सोशल ऑडिट झाल्यास मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार उघडकीस येतील, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला. प्रशासनात शिस्त, पारदर्शकता व वेळबद्ध निर्णयक्षमता आणण्यासाठी मा. तुकाराम मुंडे यांची आदिवासी विकास विभागात नियुक्ती झाल्यास विभागात सकारात्मक व मूलभूत बदल घडतील, असे बिरसा ब्रिगेडचे मत आहे.
मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी या मागणीची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही संघटनेने दिलेल्या निवेदनातून दिला आहे. या निवेदनावर बिरसा ब्रिगेडचे महाराष्ट्र संघटक पांडुरंग व्यवहारे विदर्भ सचिव नाना बेले यवतमाळ जिल्हाध्यक्ष मारोती भस्मे, जिल्हा उपाध्यक्ष परसराम डावरे तालुका अध्यक्ष गजानन उघडे, सुरेश धनवे, अक्षय व्यवहारे, सखाराम इंगळे, आदींच्या सह्या आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..