काँग्रेसने नाना पटोलेंचा राजीनामा स्वीकारला? प्रदेशाध्यक्षपदासाठी ‘या’ दोन नेत्यांमध्ये रस्सीखेच, सोमवारी घोषणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला बहुमत मिळाले. तर महाविकासआघाडीचा सुफडासाफ झाला. महायुतीने २३० जागांवर विजय मिळाला. तर महाविकासआघाडीला केवळ ४६ जागांवर समाधान मानावे लागेल.
राज्यात फक्त १६ जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. यामुळे काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली. विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचा दारुण पराभव झाला. यानंतर गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसच्या गोटात मोठ्या हालचाली सुरु आहेत. त्यातच आता लवकरच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानतंर नाना पटोलेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगली होती. नाना पटोले हे काही दिवसांपूर्वी दिल्लीला रवाना झाले होते. त्यांनी २४ नोव्हेंबरला काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केल्याचे बोललं जात होतं. त्यानंतर नाना पटोले यांना काँग्रेस हायकमांडकडून वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहण्यास सांगितले होते. यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाचे मोठे संकेत सध्या मिळत आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी दोन नावांमध्ये रस्सीखेच
काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण असणार याबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी दोन नावांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. काँग्रेस हायकमांडकडून सध्या अमित देशमुख आणि सतेज पाटील या दोन नेत्यांच्या नावाचा प्रदेशाध्यक्षपदासाठी विचार सुरु आहे. अमित देशमुख आणि सतेज पाटील अशा दोन नावांची चर्चा असली तरी सतेज पाटील यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबद्दल येत्या सोमवारपर्यत अधिकृत घोषणा होऊ शकते, असे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
नाना पटोलेंचे राजीनामा स्वीकारला?
राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभव झाला. या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे हे नेते पराभूत झाले होते. नाना पटोले यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला होता. आता हा राजीनामा काँग्रेस हायकमांडकडून स्वीकारण्यात आल्याचे बोललं जात आहे.
राज्यात महायुती सरकार
दरम्यान यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. तर महाविकासआघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या. तसेच अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. यामुळे राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे.