तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी मंत्री संजय राठोडांना दिलासा; जनहित याचिका उच्च न्यायालयाने काढली निकाली….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “एका तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय राठोड यांना दिलासा मिळाला आहे. संजय राठोड यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे.
त्यामुळे संजय राठोड यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुणे येथे फेब्रुवारी 2021 मध्ये इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडून तरुणीच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी शिवेसेना मंत्री संजय राठोड यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी करणारी याचिका दाखल झाली होती. मात्र संबंधित तरुणी मद्याच्या नशेत घराच्या गच्चीत फिरत होती, त्यात गच्चीवरून पडून तिचा मृत्यू निष्पन्न झालं आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं संबंधित तरुणीचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाल्याचे राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला सांगितलं. याशिवाय, या तरुणीचा मृत्यू आत्महत्या किंवा अपघात होता या निष्कर्षाप्रती पोहोचून पोलिसांनी प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा अहवाल कनिष्ठ न्यायालयात सादर केला होता. हा अहवाल कनिष्ठ न्यायालयानेही स्वीकारला आहे, असेही महाधिवक्त्यांनी न्यायालयाला सांगितलं. या गोष्टींची नोंद घेत उच्च न्यायालयाने संजय राठोडांविरोधातील याचिका निकाली काढली आहे.
तरुणीच्या आई वडिलांनी जबाब काय दिलेला?
आमचा कोणावरही आरोप नाही, मुलीच्या मृत्यूनंतर या विषयाला राजकीय वळण दिले गेले. त्यानंतर जे काही घडले तो सर्व पॉलिटिकल ड्रामा होता, असा जबाब तरुणीच्या पालकांनी पुण्यातील वानवडी पोलिसांकडे नोंदवला होता.
नेमकं प्रकरण काय?
07 फेब्रुवारी 2021 रोजी पुण्यातील महंमदवाडी भागातील इमारतीच्या गच्चीवरुन पडून एका तरुणीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर तरुणीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे आरोप झाले होते. विरोधकांनी रान पेटवल्यानंतर राठोड काही काळ नॉट रिचेबल झाले होते. काही दिवसांनी यवतमाळमध्ये पत्रकार परिषदेत घेत राठोड यांनी आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला होता, मात्र विरोधीपक्षांनी अधिवेशन चालू न देण्याची भूमिका घेतल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचं संजय राठोड यांनी स्पष्ट केलं होतं. मुंबईला येऊन 28 फेब्रुवारीला त्यांनी राजीनामा दिला होता.