१ एप्रिलपासून महागणार महामार्गांवरील प्रवास; ५ ते १० रुपयांनी वाढणार टोल टॅक्स; वाहनांच्या वर्दळीमुळे वाढला देखभाल-दुरुस्तीवरील खर्च…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “सध्या राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहनांना विशेषत: कारसाठी (एकेरी वाहतूक) ७५ रुपये, टेम्पोसाठी ११५ रुपये, सहा टायर वाहनांसाठी २४५ तर दहा ते त्याहून अधिक टायरच्या वाहनांसाठी ३९५ रुपयांचा टोल टॅक्स भरावा लागतो.
आता महामार्गांचा विस्तार, वाहनांची वाढलेली वर्दळ आणि देखभाल-दुरुस्तीवरील वाढता खर्च, या बाबींचा विचार करता १ एप्रिलपासून टोल टॅक्स पाच ते दहा रुपयांपर्यंत वाढू शकतो, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातून सोलापूर-पुणे, सोलापूर-हैदराबाद, सोलापूर-धाराशिव, सोलापूर-विजयपूर, नागपूर-रत्नागिरी असे महामार्ग गेले आहेत. या महामार्गांवर सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत सात टोल नाके आहेत. दररोज या महामार्गांवरून सुमारे दोन-अडीच लाख वाहने ये-जा करतात. महामार्ग चकाचक होत असतानाच टोलचे दर देखील दरवर्षी वाढत आहेत. पण, सध्या सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गांवरुन वाहनांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत असल्याची स्थिती मोहोळ तालुक्यातील वडवळ ते चंद्रमौळी, अनगर पाटी ते शेटफळ या अंतरावर दिसून येते.
दरम्यान, टोल टॅक्स भरून प्रवास करणारे वाहन २४ तासात त्याच मार्गावरून परत आल्यास त्यांना पूर्वी भरलेल्या रकमेतील निम्मी रक्कम भरावीच लागते, अशी सद्य:स्थिती आहे. त्यानुसार कारसाठी (२४ तासात ये-जा करण्यासाठीचा टोल) ११० रुपये, टेम्पोसाठी १७५ ते १८० रुपये, सहा टायर ट्रकसाठी ३७० रुपये, १० व त्याहून अधिक टायरच्या वाहनांसाठी ५९० रुपयांचा टोल टॅक्स भरावा लागतो. आता तो टॅक्स १० रुपयांपर्यंत वाढेल.
‘डब्ल्यूपीआय’नुसार वाढतो टोल टॅक्स
दरवर्षी टोल टॅक्समध्ये वाढ केली जाते आणि १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होते. यंदा टोल टॅक्स वाढीसाठी नेहमीप्रमाणे व्होलसेल प्राइस इंडेक्सचा (डब्ल्यूपीआय) आधार घेतला जाईल. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांवर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारितील (एनएचएआय) सात टोल नाके आहेत.
– राकेश जावडे, प्रकल्प संचालक, एनएचएआय, सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील टोल नाके
इचगाव (ता. मंगळवेढा)
पाटकूल, सावळेश्वर (ता. मोहोळ)
वरवडे (ता. माढा)
नांदणी (ता. अक्कलकोट)
वळसंग (ता. दक्षिण सोलापूर)
अनकढाळ (ता. सांगोला)
‘डब्ल्यूपीआय’च्या आधारे वाढतो टोल
केंद्र सरकारच्या वाहतूक विभागाकडून कोणत्या महामार्गांवरुन किती वाहने दररोज ये-जा करतात, त्या महामार्गाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी दरवर्षी किती खर्च करावा लागतो, आणखी काय उपाययोजना अपेक्षित आहेत, अशा विविध बाबींचा विचार करून व्होलसेल प्राइस इंडेक्स निश्चित केला जातो. त्यावरुन कोणत्या महामार्गांवर किती टोल टॅक्स वाढवायचा हे निश्चित होते. त्यानुसार १ एप्रिलपासून नवे दर लागू होतात, असेही अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.