संपामुळे एसटीचे आतापर्यंत 605 कोटीचे नुकसान :- अनिल परब….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे महामंडळाचे ६०५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमवारी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन अदा करून त्यांची वैद्यकीय देयके निकाली काढण्याबाबत तारांकित प्रश्न भाजपचे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विचारला होता. यावेळी झालेल्या चर्चेत शशिकांत शिंदे, परिणय फुके, गोपीचंद पडळकर यांनी उपप्रश्न विचारले.
या प्रश्नांवर परब म्हणाले की, संपामुळे महामंडळाचे ६०५ कोटींचे नुकसान झाले आहे. शिवाय, संपामुळे सामान्य जनता यामुळे वेठीस धरली गेली. कामावर परत येण्याचे वारंवार आवाहन करूनही अनेक कर्मचारी कामावर परतले नाहीत. निलंबनाची कारवाई मागे घेण्याचे आश्वासन देऊनही कामावर परतले नव्हते. त्यामुळे बडतर्फ कामगारांच्या बडतर्फीचा निर्णय ताबडतोब मागे घेता येणार नाही.
या कामगारांना कामावर परतण्यासाठी अनेक संधी दिल्या. त्यामुळे एसटी पूर्णपणे क्षमतेने सुरू झाल्यानंतरच याबाबत विचार करता येईल, असेही ते म्हणाले. एसटी संपादरम्यान पाच एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, या मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचे निर्देश महामंडळाला देण्यात आले आहेत. यासंदर्भात छाननी सुरू आहे.
‘कामगारांनी अफवांना बळी पडू नये’
कामगारांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याचा कोणताही ठराव झालेला नाही, असे परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली असून, देशातील कोणत्याही राज्यात मिळणाऱ्या पगाराएवढा पगार आता या कर्मचाऱ्यांना मिळत आहे. पगार दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत नियमित जमा होईल याची हमी सुद्धा राज्य शासनाने घेतली आहे, अशी माहितीही मंत्री परब यांनी दिली.
विलिनीकरण संदर्भात त्रिसदस्यीय समितीचा जो काही अहवाल येईल तो राज्य सरकार मान्य करेल. तोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात राज्य सरकारने भरीव वाढ करूनही एसटी कामगारांचा संप सुरू असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अफवांचे बाजार उठवून हा संप भडकवला जात आहे, कामगारांनी अफवांना बळी पडू नये, असे आवाहनही मंत्री परब यांनी यावेळी केले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..