५ ते १४ वयोगटातील मुलांना ऑमिक्रॉनचा सर्वाधिकार धोका ; WHO चा इशारा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- दक्षिण आफ्रिकेतून पसरलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत दहशतीचे वातावरण निर्माण झालेय. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने लहान मुलांमध्ये होणाऱ्या कोरोना संसर्गााबाबत एक महत्त्वाची माहिती शेअर केली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोपातील कार्यालयाने मंगळवारी सांगितले की, ५ ते १४ वयोगटातील मुलांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे संक्रमण वेगाने वाढतेय. त्यामुळे लहान मुलांना ओमिक्रॉन सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले जातेय.
WHO च्या युरोपियन प्रादेशिक संचालक डॉ. हंस क्लुगे यांनी सांगितले की, लसीकरणामुळे दिलासा मिळत असून मृत्यू होणाऱ्यांची संख्याही कमी आहे. मात्र ५३ देशांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यांची संख्या दुप्पट झाली आहे, डेल्टा व्हेरिएंट अजूनही पसरत आहे यादरम्यान २१ देशांमध्ये ओमिक्रॉनची ४३२ प्रकरणे समोर आली आहेत. डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण अजूनही युरोप आणि मध्य आशियामध्ये आढळून येतायत. परंतु लसीकरणामुळे गंभीर आजार आणि मृत्यू रोखण्यास मदत होतेय. मात्र ओमिक्रॉन हा व्हेरिएंट गंभीर आहे की नाही हे स्पष्ट होणे अद्याप बाकी आहे.
मुलांमध्ये ओमिक्रॉन संसर्गाची २ ते ३ पटीने वाढ
युरोपातील अनेक देशांमध्ये लहान मुलांमध्ये संसर्ग होण्याचे प्रमाण दोन ते तीन पटीने वाढल्याने क्लुगे यांनी चिंता व्यक्त केलीय. शिवाय वृद्ध, आरोग्य सेवा कर्मचारी आणि रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या लोकांच्या तुलनेत लहान मुलांना संसर्गाचा कमी सामना करावा लागतोय. मात्र घरातील मोठ्या वयस्कर व्यक्तींमुळे मुलांना संसर्ग होण्याचा धोका वाढतोय. अशातच मुलांचे लसीकरण न झाल्याने गंभीर संसर्गाचा किंवा मृत्यू होण्याचा धोका १० पटीने वाढतोय. त्यामुळे लहान मुलं या संसर्गास कारणीभूत ठरु शकतात.
संयुक्त राष्ट्राच्या साप्ताहिक अहवालानुसार, सध्या युरोप हा कोरोना महामारीचा केंद्रबिंदू आहे. जगभरातील ६१ टक्के मृत्यू आणि ७० टक्के प्रकरणे येथून येत आहेत.
स्पेनमध्ये ५ ते ११ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाविरोधी लस
स्पेनच्या आरोग्य मंत्रालयाने वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ५ ते ११ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस देण्यास मान्यता दिली आहे. युरोपातील अनेक देशांमध्ये मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. स्पेनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की ३२ लाख डोस १३ डिसेंबरला येतील आणि त्यानंतर १५ डिसेंबरपासून मुलांचे लसीकरण सुरू होईल.