देशात २४ तासांत ६ हजारांवर नवे बाधित….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- देशात कोरोना (Corona) विषाणूचा कहर सुरुच आहे. त्यातच आलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटने (Omicron Variant) चिंतेत भर टाकली आहे. देशात सोम वारी दिवसभरात कोरोनाचे 6 हजार 822 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
तर, 220 कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमिक्रॉनन व्हेरियंटचे 23 रुग्ण सापडले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 95 हजार 14 झाली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4 लाख 73 हजार 757 झाली आहे. आकडेवारीनुसार, सोमवारी दिवसभरात 10 हजार 4 रुग्ण बरे झाले, त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 40 लाख 79 हजार 612 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
देशव्यापी लसीकरण मोहीमेतंर्गत आतापर्यंत कोरोनावरील प्रतिबंधक लसीचे 128 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. सोमवारी दिवसभरात 79 लाख 39 हजार 38 डोस देण्यात आले. आतापर्यंत 128 कोटी 76 लाख 10 हजार 590 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत. सोमवारी, मुंबईतील दोन लोकांमध्ये ओमिक्रॉनची लागण झाल्याचं समोर अली आहे. दोघेही 25 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून परतले होते आणि त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर विषाणू ओमिक्रॉन आहे की नाही हे तपासण्यासाठी एनआयव्ही, पुणे येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुना पाठवण्यात आला. आता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ओमिक्रॉनची लागण झालेल्यांची संख्या 10 झाली आहे. आतापर्यंत, देशात 23 जणांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे.