संसदेत चर्चे वेळी गोंधळ ; काँग्रेस राष्ट्रवादीसह TMC ने केला वॉक आऊट…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- संसदेत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी महागाईवर चर्चेची मागणी केली. मात्र राज्यसभेच्या उपसभापतींनी ही मागणी फेटाळून लावली.
संसदेचं हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरु असून संसदेच्या दोन्ही सभागृहात १२ खासदारांच्या निलंबनामुळे गदारोळ होत आहे.
खासदारांच्या गोंधळामुळे कामकाजात अनेक अडचणी निर्माण होत आहे. गुरुवारीसुद्धा १२ खासदारांच्या निलंबनाविरोधात आंदोलन सुरु आहे. संसदेच्या आवारातील गांधीजींच्या पुतळ्यासमोर निलंबित खासदार धरणे आंदोलन करत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ विरोधी पक्षातील खासदार काळी फीत बांधून पोहोचले होते. हुकुमशाही चालणार नाही म्हणत खासदारांनी विरोध दर्शवला.
संसदेत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी महागाईवर चर्चेची मागणी केली. मात्र राज्यसभेच्या उपसभापतींनी ही मागणी फेटाळून लावली. ते म्हणाले की, प्रश्नकाळात यावर चर्चा होऊ शकत नाही. यानंतर काँग्रेस (Congress) खासदारांनी राज्यसभेतून वॉक आऊट केलं. तर शेतकरी आंदोलनात मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना २५ लाखांची भरपाई मिळावी अशी मागणी काही खासदारांनी केली. ही मागणीसुद्धा सरकारने मान्य केली नाही. त्यामुळेच वॉकआऊट केल्याचं खासदार राम गोपाल यादव (Ram Gopal Yadav) यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राजद, टीआरएसने राज्य सभेत महागाईच्या मुद्द्यावरून वॉक आऊट केलं. तर १२ खासदारांच्या निलंबनासह विविध मुद्द्यांवर तृणमूल काँग्रेसनेसुद्धा वॉकआऊट केलं. यावेळी वेलमध्ये येऊन खासदारांनी जोरदार घोषणाबाजी करत महागाईवरून सरकारविरोधात हल्लाबोल केला.
लोकसभेत आज कोरोनावर चर्चा होत आहे. चर्चेआधी बोलताना लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी सांगितलं की, कोरोनाने मानवजातीवर परिणाम झाला आहे. भारतावरसुद्धा सामाजिक-आर्थिक परिणाम झाले आहेत. आता नव्या ओमिक्रॉन व्हेरिअंटने चिंता वाढवली आहे. संसदेत आज कोरोनावर सकारात्मक चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. कोरोना काळातील आपले अनुभव खासदारांनी सांगावेत. तसंच त्रुटी दूर करण्यासाठी सल्लेही द्यावेत असंही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं होतं.