पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ची खासदार संजय राऊत व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सोबत बैठक व अनेक विषयावर चर्चा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- तृणमूल काँग्रेसला राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा महाराष्ट्राचा दौरा आजपासून मुंबईतील सिद्धिविनायकाच्या दर्शनाने सुरू झाला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू असल्याने त्यांची ममतांशी भेट होऊ शकली नसली तरी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि खा. संजय राऊत यांनी ममतांची भेट घेत त्यांचे स्वागत केले. उद्धव ठाकरे आणि ममता दीदींमध्ये वेगळे नाते असल्याची प्रतिक्रिया आदित्य यांनी या भेटीनंतर व्यक्त केली. ममता या उद्या (ता.१) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. प्रादेशिक पक्ष असणाऱ्या तृणमूल कॉंग्रेसला राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी विविध पक्षांची मोट बांधता यावी यासाठी ममता प्रयत्न करत आहेत. भाजप आणि कॉंग्रेसविरहित आघाडी उभारण्यासाठी ममता बॅनर्जी यांची चाचपणी सुरू असल्याचेही बोलले जाते. पवारांची भेट घेतल्यानंतर बॅनर्जी या राज्यातल्या उद्योगपतींची भेट घेऊन त्यांना ‘बंगाल ग्लोबल बिझनेस समिट’ला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देणार आहेत
”महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बरे वाटू दे, अशी प्रार्थना सिद्धिविनायकाच्या चरणी केली आहे. त्यांच्या तब्येतीला आराम वाटल्यावरच कामाला लागू दे,” असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि ज्येष्ठ नेते संजय राऊत यांना सांगितले. उद्धव ठाकरे यांना भेटण्याची त्यांची इच्छा होती. मात्र या भेटीला परवानगी नसल्याने आदित्य ठाकरे व संजय राऊत त्यांना भेटले. अर्धा तास चाललेल्या गप्पात राजकीय स्थितीची चर्चा केली असेही राऊत म्हणाले.