राज्य सरकारची नवी नियमावली ; लसीकरण नाही तर प्रवास नाही…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- संपूर्ण राज्यात लसीकरण मोहीम सुरु असतांना, राज्य सरकारने नुकताच एक महत्वाचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता फक्त लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार आहे.
आता लोकल ट्रेनप्रमाणेच एसटी, बससेवा, टॅक्सी, रिक्षा या वाहतुकीने प्रवास करण्यासाठी, दोन डोस घेणे अत्यावश्यक आहे. याशिवाय कोरोनाचे नियम न पाळणार्यांविरुद्ध दंडाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्य सरकारने याबाबत नवी नियमावली जारी केली आहे. या नव्या नियमानुसार, जर तुम्ही लसीचे दोन डोस पू्र्ण केले नसतील तर तातडीने लस घ्यावी लागेल. आता लसीकरणाशिवाय तुम्हाला सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार नाही. रिक्षा, टॅक्सीत बसलेल्या प्रवाशाने मास्कचा वापर केला नसेल तर प्रवाशाला 500 रुपये आणि रिक्षा-टॅक्सी चालकालाही 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. त्याचप्रमाणे दुकानात आलेल्या ग्राहकाने मास्क घातला नसेल तर ग्राहकाला 500, तर संबंधित दुकानदाराला 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
नव्या नियमावलीनुसार, मॉल्समध्ये ग्राहकांच्या चेहऱ्यावर मास्क नसेल तर मॉल्सच्या मालकाला तब्बल 50 हजार रुपयांचा फटका बसणार आहे. तसेच राजकीय सभांना, जाहीर कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र नियम पाळले जात नसतील तर संबंधित आयोजकांवर 50 हजार दंड आकारण्याबरोबर कार्यक्रम बंद करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे. तसेच राज्य सरकारकडून युनिवर्सल पास देण्यात आले आहेत. प्रवास करताना लसीकरण प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र असणं बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना पूर्ण लसीकरण असलेले प्रमाणपत्र किंवा प्रवासाच्या ७२ तास आधीचा आरटी पीसीआर चाचणी रिपोर्ट देणे बंधनकारक असणार आहे. सोबतच किमान ६ फूट अंतर राहील असे सोशल डिस्टेंसिंगचे पालन करणे आवश्यक आहे.