नागपुर मध्ये बेंगळुरु-पटना विमानाचे इमरजेंसी लैंडिंग ; प्रवासी सुरक्षित….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- बेंगळुरूहून पाटण्याला जाणाऱ्या विमानाचे नागपूरमध्ये (Nagpur Airport) इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले आहे. तांत्रिक अडचणींमुळे गोफर्स्ट कंपनीचे विमान आपत्कालीन स्थितीत नागपूर विमानतळावर उतरविण्यात आले आहे.
विमानात 139 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते, अशी माहिती नागपूर विमानतळा अधिकारी आबिद रुही यांनी दिली आहे. विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने वैमानिकाने विमान सकाळी साधारण 11:15 वाजण्याच्या सुमारास नागपूर विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. दरम्यान विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे रूही यांनी सांगितले.
विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर “गोफर्स्ट विमानाच्या वैमानिकाने नागपूर एटीसीशी संपर्क साधला, त्यानंतर लगेचच विमानतळावर आणीबाणी घोषित करण्यात आल्याचे रूही म्हणाले. विमानातील सर्व प्रवाशांना सुखरूप उतरविण्यात आले असून पाटण्याला जाण्यासाठी दुपारी 4 वाजून 45 मिनिटांनी पर्यायी विमानाची सोय करण्यात आली आहे. विमानाच्या इंजिनाची तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात येत आहे.