एसटी संप : सरकारच्या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांना नेमकी किती आणि कशी वेतनवाढ मिळणार…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :-
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळा बुधवारी झालेल्या बैठकीत विलीनीकरणाऐवजी कर्मचाऱ्यांचा पगारवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला . यामध्ये एसटीच्या पहिल्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पाच हजार रुपयांची वाढ करण्याची घोषणा परब यांनी केली . मात्र , आंदोलक कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत .
राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन २७ ऑक्टोबरपासून सुरू असून , एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कामगारांनी संप पुकारला आहे . एसटी कर्मचाऱ्यांनी गेले दोन आठवडे मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडले आहे . विलिनीकरण मुद्द्यावरून न्यायालयाने उच्च समिती स्थापन करण्यात आली आहे . या समितीचा अहवाल येईपर्यंत राज्य सरकारने समेटाचा मार्ग काढत बुधवारी कामगारांच्या पगारवाढीची घोषणा केली . परिवहमंत्री अनिल परब यांनी < पगारवाढीची घोषणा केल्यानंतर आंदोलन मागे घेतले जाईल , हा सरकारचा अंदाज पूर्णपणे खोटा ठरला . त्याउलट , आझाद मैदान येथे जमलेल्या आंदोलक कर्मचाऱ्यांमधील रोष आणखी वाढला . ' आम्हाला विलीनीकरणच हवे ' या मागणीचा पुनरुच्चार करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली .
त्याआधी परब यांनी पत्रकार परिषद घेऊन पगारवाढीविषयी सविस्तर माहिती दिली . विलीनीकरणासंदर्भात उच्च न्यायालयाने तीन सदस्यांची समिती स्थापन केली असून , १२ आठवड्यांच्या आत या समितीला अहवाल द्यायचा आहे . ही समिती जो निर्णय घेईल तो निर्णय मान्य असेल , अशी राज्य सरकारची भूमिका आहे . समितीचा अहवाल यायला अजून बराच वेळ आहे , अशा वेळेला काय करायचं याबाबत आम्ही सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर ; तसेच मंत्री उदय सामंत यांच्या चर्चा केली . ' विलीनीकरणाचा निर्णय समितीने राज् सरकारला दिला तर तो आम्हाला मान्य असेल . पण तो निर्णय होईपर्यंत हा तिढा असाच कायम ठेवता येणार नाही . म्हणून सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे . ही वाढ त्यांच्या मूळ पगारात करण्यात येणार आहे , ' असे परब यांनी सांगितले .
प्रस्तावीत वाढीनंतरचे वेतन - एक ते १० वर्षे या श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पाच हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे . त्यामुळे , १२ हजार ८० रुपये असणारे मूळ वेतन १७ हजार ८० रुपये झाले आहे . ज्यांचे मूळ वेतन १७ हजार होते , त्यांना आता २४ हजार रुपये वेतन होणार आहे . ही वाढ ४१ टक्के एवढी आहे .
- १० ते २० वर्षे या श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात चार हजार रुपयांनी वाढ केली आहे . त्यामुळे , ज्यांचे वेतन १६ हजार होते , त्यांचे वेतन आता २३ हजार ४० रुपये झाला आहे . २० वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या कामगारांना अडीच हजार रुपयांची वेतन वाढ देण्यात येणार आहे . त्यामुळे , ज्यांचे मूळ वेतन २६ हजार रुपये होते आणि त्यांचे स्थूल वेतन ३७ हजार ४४० रुपये होते , त्यांचे पूर्ण वेतन आता ४१ हजार ४० रुपये झाले आहे . - तर , ज्यांचे मूळ वेतन ३७ हजार होते आणि स्थूल वेतन ५३ हजार २८० रुपये होते , त्यांचे मुळ वेतन आता ३ ९ हजार ५०० रुपये होईल , तर सुधारित वेतन ५६ हजार ८८० रुपये होईल .
तिजोरीवर ३६० कोटींचा बोजा या पगारवाढीसाठी प्रत्येक महिन्याला ६० कोटींचा अतिरिक्त बोजा स्वीकारावा लागला असून त्यामुळे महिन्याला ३६० कोटी रुपयेचा बोजा राज्य सरकारवर पडणार आहे . यासाठी ७५० कोटी रुपये आम्हाला मोजावे लागणार आहेत . आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटीचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे . त्यामुळे कामगारांनी एसटी पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत , असे आवाहन अनिल परब यांनी या वेळी केले .
कर्मचारी विलीनीकरणावर ठाम राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी ठाम असून त्याचे प्रतिबिंब आझाद मैदानात सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात पुन्हा उमटले आहे . परिवहन मंत्री अनिल परब यांनी बुधवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याची घोषणा केली . मात्र , संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याचे स्पष्ट करत आक्रमक स्वरुप धारण करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली .