तारांगण प्रकल्पातून मुलांच्या वैज्ञानिक ज्ञानात भर पडेल :- पालकमंत्री संदिपान भुमरे ; विकास कामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल ; नाट्यगृहाचे अपुर्ण कामे पुर्ण करण्यासाठी ४ कोटी निधी देणार ; अमृत पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांना बोलावणार…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- नगर परिषदेद्वारे लहान मुलांकरिता तारांगण सारख्ये चांगले उपक्रम घेण्यात आले असून या प्रकल्पातून लहान मुलांच्या वैज्ञानिक ज्ञानात भर पडणार आहे, या प्रकल्पाचा अधिक विकास व्हावा मुलांना मनोरंजनाच्या माध्यमातून अधिक शिक्षण मिळावे यासाठी थ्रीडी आर्ट गॅलरी सारखे प्रकल्प सुरू करण्यासाठी दिड कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच येथील नाट्यगृहाचे अनेक वर्षापासून प्रलंबित अपुर्ण कामे पुर्ण करण्यासाठी चार कोटी निधी, तसेच शाळा दुरूस्ती व जिल्ह्यातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक निधी जिल्ह्याला उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी आज दिले.
नेहरू बाल उद्यान आझाद मैदान यवतमाळ येथे यवतमाळ तारांगणाचे लोकार्पण व नगर परिषद यवतमाळ च्या प्रशासकीय इमारतीवर बसविण्यात आलेल्या सौर उर्जा पॅनलचे उद्घाटन तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नगर परिषद यवतमाळ मार्फत उभारण्यात आलेल्या सावरगड बायोमायनिंग घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी नगराध्याक्षा कांचन चौधरी, मुख्याधिकारी माधुरी मडावी, सभापती विभा कुळकर्णी, पदाधिकारी तसेच नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे बोलतांना म्हणाले की यवतमाळ शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अमृत योजनेतून लवकरच पुर्ण होईल व या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी करावे यासाठी त्यांना विनंती करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
नगराध्यक्षा कांचन चौधरी यांनी नेहरू उद्यानातील रिक्त जागेवर विद्यार्थ्यांसाठी थ्रीडी आर्ट गॅलरी व अधिक काही कामे प्रस्तावीत करण्यासाठी ४ कोटी रूपये, नाट्यगृहासाठी तसेच नगरपालीकेच्या शाळेंची दुरूस्ती व विद्यार्थ्यांना अभ्यासाठी अद्यावत साहित्य खरेदीसाठी निधीची मागणी पालकमंत्र्यांकडे केली.
कार्यक्रमाचे प्रास्तावीक मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी केले. यवतमाळ शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी नवीन आवाहने पेलण्यास सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री भुमरे यांनी नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीवर बसविण्यात आलेल्या सौर उर्जा पॅनलचे उद्घाटन केले. तसेच सावरगड येथे भेट देवून तेथील बायोमायनिंग घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पांतर्गत 17.05 एकर परिसरातील 2008 ते 2014 पर्यंतच्या 15298 घन.मी. कचऱ्याचे बायोमाईनिंग करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला राजेंद्र गायकवाड, संतोष ढवळे, पिंटू बांगर, वैद्यकीय अधिकारी विजय अग्रवाल, अजयसिंग गहरवाल, नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, उपस्थित होते.