राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसचा उमेदवार जाहीर, रजनी पाटील यांच्या नावाची घोषणा
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद
काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाला आहे. रजनी पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसनं उमेदवाराची घोषणा केलीय. रजनी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलीय. राजीव सातव यांच्या निधनानं एक जागा रिक्त झाली होती, त्यांच्या जागेवर आता रजनी पाटील निवडणूक लढवतील. रजनी पाटील ह्या सध्या जम्मू आणि काश्मीरच्या काँग्रेस प्रभारी आहेत. त्या आधीही राज्यसभेवर होत्या. त्यानंतर आता त्यांना पुन्हा संधी देण्यात आलीय. विशेष म्हणजे विधान परिषदेसाठीही राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीतही रजनी पाटील यांचं नाव आहे. तो निर्णय़ अजून राज्यपालांकडे प्रलंबित आहे. त्याच पार्श्वभूमीवर रजनी पाटील यांना उमेदवारी दिली गेलीय. विशेष म्हणजे आज सकाळीच भाजपानं राज्यसभेच्या एका जागेची निवडणूक लढण्याची घोषणा केलीय. त्यात संजय उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आलीय.
*कोण आहेत रजनी पाटील?*
रजनी पाटील ह्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्या राज्यसभेच्या खासदार होत्या. आता जम्मू आणि काश्मीरच्या त्या काँग्रेस प्रभारी आहेत. ठाकरे सरकारनं ज्या 12 नेत्यांची नाव विधान परिषदेवर घेण्यासाठी राज्यपालांकडे पाठवलेली आहेत. त्यात काँग्रेसनं रजनी पाटील यांचंही नाव दिलेलं आहे. 1996 साली त्या बीडमधून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. राजकारणाची सुरुवात त्यांनी जिल्हा परिषदेतून केलेली आहे.
भाजपकडून संजय उपाध्याय
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या जागेबाबत भाजपकडून कोण लढवणार? याबाबतचा सस्पेन्स संपुष्टात आला आहे. भाजपकडून संजय उपाध्याय निवडणूक लढणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. राज्यसभा भाजप लढणार आहे. मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय हे आमचे राज्यसभेचे उमेदवार असतील. 22 तारखेला सकाळी 11 वाजता ते फॉर्म भरायला जाणार आहेत, अशी घोषणा पाटील यांनी केली.