अंबोडानंतर लोणी येथील बोअरवेलमधून गरम पाणी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव. / आर्णी :
महागाव तालुक्यातील अंबोडा येथील बोअरवेलमधून गरम पाणी येत असलेल्या निसर्गाच्या चमत्कारानंतर असाच प्रकार आता आर्णी तालुक्यातील लोणी येथील बोअरवेलमधून गरम पाणी निघत असल्याचे दिसून आले. या अजब प्रकाराने गावकऱ्यांमध्ये आश्चर्यासह भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महागाव तालुक्यात रविवारी मुडाणा नजीक साधूनगर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. मराठवाड्यातील हिंगोली,परभणी ,आणि नांदेडात त्याचे धक्के जाणवले. त्यानंतर भूकंप केंद्रबिंदू असलेल्या महागाव तालुक्यातील अंबोडा येथील माधव भोयर यांच्या अंगणातील बोअरवेलमधून गरम पाणी निघत असल्याची वार्ता पसरली.. भूकंपामुळे हा प्रकार चर्चेचा विषय ठरला.
(अंबोडा येथील गरम पाण्याची हाताळणी करताना नागरिक )
असाच प्रकार आता आर्णी तालुक्यातील लोणी येथे उघडकीस आला आहे.लोणी येथील साहेबराव पानचोरे यांच्या घरी बोअरवेल आहे. त्या बोअरवेलमधूनही गरम पाणी निघत आहे. पानचौरे यांनी सहा वर्षांपूर्वी आपल्या अंगणात बोअरवेल खोदली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यातून गरम पाणी निघत आहे.
अत्यंत कमी प्रमाणात गरम पाणी निघत होते. मात्र, गेल्या दोन-चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गरम पाणी निघत आहे. याबाबत नीलेश पानचौरे यांनी आर्णी तहसीलदार परशराम भोसले व तलाठी भाऊ उबाळे
यांना माहिती दिली आहे. दरम्यान, या प्रकाराने गावकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. सोबतच त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महागाव आंबोडा येथील निसर्गाच्या चमत्कार उष्ण पाण्याची दखल जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाने घेत घटनास्थळी पाहणी केली आहे.भूजल सर्वेक्षण चमुंना पाहणी दरम्यान उष्ण पाणी ४० डिग्री सेल्सिअस असल्याचे दिसून आले.त्यामुळे बोअरमालक माधवराव भोयर यांनी पाणी वापर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.