कोव्हीडमुळे पालक गमविलेल्या कुटुंबांना प्रत्यक्ष जाऊन मदत करा ; बालकल्याण समितीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश ; बाल संगोपन योजनेद्वारे 1100 रुपये प्रतिमाह मदत…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 9 :- कोविडमुळे ज्या बालकांनी आपले एक किंवा दोन्ही पालक गमावले आहेत, अशा बालकांना शासनातर्फे बाल संगोपन योजनेअंतर्गत प्रतिमाह रुपये 1100 मदत देण्यात येते. ज्यांना मदतीची गरज आहे किंवा जे कुटूंब बालकल्याण समितीपर्यंत पोहचू शकत नाही अशा गरजवंत पात्र कुटूंबीयांपर्यंत समितीने प्रत्यक्ष पोहचावे व त्यांना मदत करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बालसंरक्षण समितीच्या कृती दल समितीच्या कामकाजाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, बालकल्याण समितीचे अध्यक्ष ॲड. एस.पी.घोडेस्वार, जिल्हा विधी सेवा प्राधीकरणचे सचिव एम.आर.ए.शेख, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. टि.ए.शेख, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 100 टक्के कुटूंबांचा शोध घेवून त्यांना तातडीने मदत करण्यात यावी, यासाठी समाजकार्य महाविद्यालयाच्या इच्छुक विद्यार्थ्यांची मदत घ्यावी. तसेच गृहभेटी देवून चौकशी करतांना आढळून येणाऱ्या विधवा महिलांनादेखील संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात यावा तसेच त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर होता यावे यासाठी कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्यासाठी प्राधाण्य देण्यात बाबत प्रस्ताव सादर करण्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू यांनी या योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत कोवीडमुळे पालक गमावलेल्या 217 मुलांचा शोध घेण्यात आला असल्याचे सांगितले. यापैकी 162 मुलांनी आपले वडील गमावले असून 51 मुलांनी आई गमावली आहे तर 4 मुलांनी आई व वडीला दोघांनाही गमावले आहे. याशिवाय शहरी भागातील सव्हेक्षणाचे काम अद्याप पुर्ण व्हायचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांचे हस्ते महिला व बालविकास विभागाद्वारे प्रकाशीत करण्यात आलेल्या कोविड संसर्गामध्ये अडचणीत सापडलेल्या बालकांसाठी मदत व बालसंगोपन योजनेवरील जनजागृती पोस्टरचे विमोचन करण्यात आले.
बैठकीला जिल्हा बाल पोलिस पथकाच्या प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक एस.एल. आगाशे, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. शरद मातकर, नगर परिषदेचे के.बी. शर्मा व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.