दस्त नोंदणीच्या सोयीसाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध ; गर्दी टाळण्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे आवाहन…
दस्त नोंदणीच्या सोयीसाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध ; गर्दी टाळण्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे आवाहन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 9 :- राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुद्रांक विभागाने नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व दस्त नोंदणीच्या सोईसाठी काही ऑनलाईन सेवा उपलब्ध केल्या आहेत. सदर सेवांचा नागरीकांनी वापर करून दुय्यम निबंधक कार्यालयातील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने सेवा व सुविधांचा वापर करून दस्त नोंदणी बाबत शासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
नागरिकांनी मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर असलेल्या दस्त नोंदणीकरीता पीडीई द्वारे डाटा एंट्री करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यापूढे दुय्यम निबंधक कार्यालयातील डेटा एंट्री किंवा दुरस्त्या पूर्णपणे थांबविण्यात येत आहेत. नागरीकांनी सदर पीडीई डेटा एंट्री करून दस्त नोंदणीसाठी या विभागाच्या वेबसाईट वर ई-स्टेप-इन या प्रणालीद्वारे दुय्यम निबंधक कार्यालयातील उपलब्ध असलेली सोईची वेळ ऑनलाईन आगाऊ बुक करून किंवा कार्यालयीन दुरध्वनीवर / समक्ष साधून वेळ आरक्षित करणे अनिवार्य आहे. आगाऊ वेळ आरक्षित केली नसल्यास दस्त नोंदणी होणार नाही.
नागरीकांनी दस्ताचे निष्पादन घरी किंवा कार्यालयाच्या बाहेरच करावे. प्रत्येक व्यक्तीने सह्यांसाठी स्वत:चे पेन आणणे, एकच पेन एकमेकात सह्यांसाठी वापरू नये, आरक्षित वेळेलाच कार्यालयात हजर रहावे, मास्क लावल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही,याची नोंद घ्यावी. विभागाच्या वेबसाईट वर लिव्ह अँड लायसन ई-रजिस्ट्रेशन प्रणालीचा पर्याय उपलब्ध असल्याने लिव्ह अँड लायसन दस्ताची कार्यालयातील नोंदणी पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात येत आहे.
सर्व दुय्यम कार्यालयाच्या कामकाजाची वेळ नियमित सत्रात म्हणजेच 9.45 ते 6.15 या वेळेतच सुरु राहतील. याशिवाय जी दुय्यम निबंधक कार्यालये दस्त नोंदणीसाठी सुटीच्या दिवशी सुरु होते, त्या कार्यालयांचे कामाकाज सोमवार ते शुक्रवार पाच दिवस नियमित सुरु राहतील. नोटीस ऑफ इंटीमेशनचे फिजीकल फाईलींग पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात येत आहे. तसेच याकरीता नागरीकांना ई-फायलिंगचा व्हर्जन -1 आणि व्हर्जन -2 चा पर्याय ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आला आहे. याबाबत यवतमाळ जिल्हा मुख्यालयी असलेल्या सर्व वित्तीय बँकांनी याची नोंद घ्यावी, असे सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी आर. एन. चौधरी यांनी कळविले आहे.
००००००००