जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कोव्हिड परिस्थितीचा आढावा… रुग्णांच्या संपर्कातील नागरीकांचा शोध घेण्याचे निर्देश…
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कोव्हिड परिस्थितीचा आढावा…
रुग्णांच्या संपर्कातील नागरीकांचा शोध घेण्याचे निर्देश…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ , दि. 3 :-
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता त्यावर नियंत्रण करण्याकरीता जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, जिल्हा प्रशासन अधिकारी हर्षल गायकवाड, डॉ. गिरीष जतकर, डॉ. बाबा येलके आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, ज्याप्रमाणे मंगळवारी 2736 नमुने चाचणी करण्यात आली. त्यानुसार दररोज किमान 3 हजार ते 4 हजार नमुन्यांची चाचणी होणे आवश्यक आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे अत्यंत महत्वाचे आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी संबंधितांना याबाबत आवश्यक सूचना देऊन प्रत्येक तालुक्यात एका रुग्णामागे किमान 20 या प्रमाणात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होईल याकडे लक्ष द्यावे. तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून नमुने तपासण्या वाढवाव्यात. वणी येथील खाजगी दवाखान्यात कोव्हिड रुग्ण दगावत आहेत. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांनी या खाजगी रुग्णालयांवर विशेष लक्ष ठेवावे. यवतमाळ शहरात 150 रुग्ण क्षमतेचे दोन ते तीन कोव्हिड केअर सेंटर सुरु करणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यात जास्त बाधीत रुग्ण आल्यास त्यांची व्यवस्था होऊ शकेल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फक्त गंभीर व अतिगंभीर रुग्णांना ठेवण्यात यावे.
हेल्थ वर्कर्सचे लसीकरणावर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लक्ष देऊन लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे. पुढील 10 ते 15 दिवस जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून नमुने तपासणी करावी. याकरीता जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पथक तयार करावे, अशा सुचनाही जिल्हाधिका-यांनी दिल्या.