जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करूण शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी-आ. इंद्रनील नाईक
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद तालूका प्रतिनिधी:
सततच्या पावसामुळे काढणीला आलेल्या शेतमालाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसान झालेल्या शेतमालाचे सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी याकरिता आ.इंद्रनील नाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार यांच्याशी भेट घेऊन शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेची कल्पना दिली.यवतमाळ जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली सप्टेंबर महिन्यात मोठ्याप्रमाणात पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील काढनिस आलेल्या शेतमालाचा तोंडचा घास गेला आहे. शेतमालाच्या झालेल्या अतोनात नुकसाणामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊन कौटुंबिक जीवन विस्कळीत झाले आहे.
शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेल्या सोयाबीन, उडीद,मुंग या पिकांच्या शेंगा पावसाच्या पाण्यामुळे जागीच सडून त्यात कोंब फुटले अाहेत.हा सगळा शेतमाल शेतातच नाश पावला आहे.
कपाशीच्या पिकावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची रोग येत आहेत.कपाशीचे बोंडास बुरशी लागून ते काळे पडल्याची विदारक स्थिती जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या नशिबी अली आहे.
कोरोना या जागतिक महामारीत आधीच आर्थिक संकट ओढावलेले असतांना शेतकऱ्यांना पावसाच्या अस्मानी संकटामुळे हक्काच्या नगदी पिकापासून मुकावे लागले आहे. शेतकऱ्यांसमोर समस्यांचा डोंगर उभा ठाकला असल्याच्या भीतीने बळीराजा चिंतातुर झाला आहे.
शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या नुकसानाची कैफियत आणि विदारक परिस्थिती अनेक शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचे कैवारी असलेल्या स्व. वसंतराव नाईक साहेब, स्व.सुधाकरराव नाईक साहेब, माजीमंत्री मनोहरराव नाईक साहेब यांचा कृषिनिष्ठ वैचारिक वारसा जोपासणारे आ.इंद्रनील मनोहरराव नाईक यांचेकडे मांडली होती.
त्याअनुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यथा थेट शासन दरबारी मांडण्याच्या हेतूने आ.इंद्रनीलभाऊ नाईक यांनी दि.२८ सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब व उपमख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब यांची भेट घेवून निवेदनाद्वारे यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करून जिल्ह्यातील समस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.