“माझे पक्षप्रमुख कधी आक्षेप घेत नाहीत”; शिंदेंच्या भेटीनंतर ठाकरेंचे खासदार पक्षांतराच्या चर्चांवर काय बोलले..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “विधानसभा निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर राज्याच्या राजकारणात घडामोडी सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. सत्ताधारी शिंदेसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
अशातच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय भूकंप होण्याची चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर तर्कवितर्कांना उधाण आल्यानंतर नागेश आष्टीकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि चर्चांवर स्पष्टीकरण दिलं.
खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्यानंतर स्वतः आष्टीकर यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. “या भेटीला राजकीय रंग देण्याची गरज नाही. माझ्या मतदारसंघातील वडगाव परिसरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि विकासकामांच्या निधीसंदर्भातील निवेदन देण्यासाठी मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. ही भेट केवळ लोकहिताच्या कामासाठी होती,” असं आष्टीकर म्हणाले होते.
त्यानंतर आता खासदार आष्टीकर यांनी थेट मातोश्री गाठली. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर मराठवाडा विभागाच्या महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आष्टीकर उपस्थित होते. उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांना स्पष्ट केले की, जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांकडे जाणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. प्रत्येक भेटीसाठी वरिष्ठांची परवानगी घेण्याची गरज नसते. “माझे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मला कधीही काही बोलले नाहीत आणि त्यांनी अशा भेटींवर कधी आक्षेपही घेतला नाही,” असेही आष्टीकर म्हणाले.
कामासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे जावेच लागते- नागेश आष्टीकर
“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे जावेच लागते. त्याच हिशोबाने आमचे जाणे असते. मी कशासाठी गेलो होतो याचे पत्रही दिलं होतं. मी एकट्याने जाऊन काही होणार आहे का? हे सगळ्यांना माहिती आहे तरी पण मला चर्चेत आणता महाराष्ट्रात फिरवता. सह्याद्रीवर मी मुख्यमंत्र्यांची मी आधी भेट घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना भेटलो. अशा भेटीची पूर्वकल्पना द्यायला असं पक्षप्रमुखांनी मला कधी सांगितलं नाही. लोकांच्या अडीअडचणी असतात त्यामुळे त्यांच्यासाठी यावं लागतं. प्रत्येकवेळी भेटीसाठी जाताना विचारणा होत नाही. कुणाची कामे असतील तर जावे लागते. माझे पक्षप्रमुख मला कधी काही म्हणाले नाहीत. त्यांनी कधी आक्षेप घेतला नाही,” असं नागेश आष्टीकर म्हणाले.
निवडून आल्यापासून ऑपरेश टायगरची चर्चा
“ज्या खासदाराला वेळ असेल आणि बोलवलं असेल तर स्नेहभोजनाला जाण्यात काही गैर नाही. भेटल्यावर फक्त त्यासंदर्भातच बोलणं होईल असं कुठे असतं का? मी सुद्धा स्नेहभोजन ठेवलं त्यावेळी अनेक पक्षाचे खासदार आले होते. अशा गोष्टींकडे माणुसकीच्या नात्यानेही बघितलं पाहिजे. गेल्या दोन वर्षांपासून तुम्ही ऑपरेशन टायगर सुरु आहे म्हणता. जो करतोय त्याला तरी विचारा कधी संपणार आहे. आम्ही निवडून आल्यापासून दोन महिन्यांपासून ऑपरेशन टायगर सुरु आहे. त्याचे आता स्लो ऑपरेशन नाव ठेवा. माझा जाण्याचा काही विषय नाही. पण ज्या दिवशी जाणार असेल त्या दिवशी तुम्हाला बोलवून घेईल आणि सांगेल,” असंही नागेश आष्टीकर म्हणाले.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…