20 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक, नागपुरात CBI ची मोठी कारवाई….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “इंजिनीअरिंग विद्यार्थी श्यामल मंडल याच्या अपहरण व हत्या प्रकरणातील 20 वर्षांपासून फरार असलेला आरोपी अखेर सीबीआयच्या जाळ्यात अडकला आहे. नागपूरमध्ये बनावट नावाने वास्तव्य करत असताना सीबीआयकडून त्याला अटक करण्यात आली.
तिरुवनंतपुरम येथील इंजिनीअरिंग विद्यार्थी श्यामल मंडल याच्या अपहरण व हत्या प्रकरणात गेल्या 20 वर्षांपासून फरार असलेला आरोपी दुर्गा बहादुर भट्ट छेत्री उर्फ दीपक याला सीबीआयने नागपूरमधून अटक केली आहे. इतक्या वर्षांनंतर आरोपीला पकडण्यात यश आल्याने या प्रकरणातील ही मोठी कारवाई मानली जात आहे.
श्यामल मंडल बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या वडिलांना खंडणीसाठी फोन आला होता. त्यानंतर 23 ऑक्टोबर 2005 रोजी तिरुवनंतपुरममधील तिरुवल्लम परिसरातील वेल्लारजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. यावरून त्यांचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. सीबीआयच्या तपासात असे निष्पन्न झाले की, श्यामलची हत्या दुर्गा बहादुर भट्ट छेत्री याने त्याचा साथीदार मोहम्मद अली याच्या मदतीने केली होती. हे दोन्ही आरोपी अंदमान-निकोबार येथील रहिवासी असल्याचे समोर आले होते. घटनेनंतर दुर्गा बहादुर फरार झाला आणि आपली ओळख बदलून विविध ठिकाणी लपून राहत होता.
या प्रकरणात सीबीआयने दोन्ही आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. सहआरोपी मोहम्मद अली याच्यावर खटला चालवण्यात आला आणि 2022 मध्ये त्याला दोषी ठरवण्यात आले. मात्र, दुर्गा बहादुर फरार असल्याने न्यायालयाने त्याला ‘घोषित गुन्हेगार’ (Proclaimed Offender) म्हणून घोषित केले होते. दरम्यान, सीबीआयला मिळालेल्या माहितीनुसार हा फरार आरोपी नागपूरमध्ये बनावट नावाने राहत असल्याचे समोर आले. माहितीची खात्री झाल्यानंतर सीबीआयच्या पथकाने नागपूरमध्ये छापा टाकून 27 मार्च रोजी त्याला अटक केली.
या प्रकरणी करण्यात आलेल्या तपासात असेही उघड झाले की, हत्येनंतर आरोपीने आपली ओळख बदलून ‘सूरज बी. भट्ट’ या नावाने नवे आयुष्य सुरू केले होते. या बनावट ओळखीच्या आधारे त्याने लग्न केले आणि नागपुरातच स्थायिक झाला होता. अटक करण्यात आलेल्या आरोपीला आता एर्नाकुलम येथील न्यायालयात हजर करण्यात येणार असून, या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआय करत आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…