देऊळगावराजा भाजपा नगराध्यक्षपतीला लाच घेताना अटक
लाच लुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई, नोकरीला लावून देण्याचा ठरावासाठी घेतली रक्कम
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
प्रतिनिधी : बुलडाणा
देऊळगावंराजा येथील भाजपच्या नगरध्यक्षा असलेल्या सुनीता शिंदे यांचेपती डॉ.रामदास शिंदे हे आज शुक्रवारी ४ सप्टेंबर रोजी त्यांच्या राहत्या घरी ८० हजारांची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडल्याची घटना घडली आहे. देऊळगावराजा नगर परिषदेमध्ये एका महिलेला अनुकंपा तत्वावर नोकरी लावण्याकरीता ठराव घेवून देण्यासाठी ८० हजारांची मागणी केली होती.
देऊळगावराजा नगर परिषदेत अध्यक्ष पदावर जनतेमधून भाजपच्या सुनीता रामदास शिंदे हया निवडून आल्या आहेत. तक्रारदार याची पत्नी आपल्या आईच्या जागेवर अनुकंपावर देऊळगावराजा नगर परिषदेत नोकरीला लागणार आहे. अनुकंपावर नोकरीसाठी नगर परिषदेत ठरावाकरिता अध्यक्षपती डॉ.रामदास शिंदे यांनी १ लाखाची लाच मागितली. यामध्ये ८० हजारात तडजोडी करण्याचे ठरविले असल्याने तक्रारदाराने याची तक्रार बुलडाणा लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे केली. यावरून पडताडणी करून आज ४ सप्टेंबर रोजी शुक्रवारीला तक्रारदार यांच्याकडून मागितलेल्या खंडणीचे ८० हजाराची लाच घेतांना नगराध्यक्षा पती डॉ.रामदास शिंदे यांना डॉ.शिंदे हॉस्पिटल येथे आपल्या राहत्या घरी लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपअधीक्षक मलघने यांच्या पथकाने रंगेहात पकडले असून त्यांना ताब्यात घेवून पुढील कारवाई सुरू आहे. अशी माहिती लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस उपअधीक्षक आर.एन.मलघणे यांनी दिली आहे. या पथकात साखरे, विजय मेहेत्रे, स्वाती वाणी, रविंद्र दळवी, सुनिल राऊत, विनोद लोखंडे व चालक मधुकर रगड यांचा सहभाग होता.