कंगनाने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही ; भाजपाचा ‘ यू – टर्न ‘
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. यातच भाजपा आमदार राम कदम यांनी कंगना राणौतबाबत केलेल्या वक्तव्यापासून भाजपाने हात झटकले आहेत. तसेच, कंगना राणौतचे समर्थन करणाऱ्या भाजपाने आता यू टर्न घेतला आहे. शुक्रवारी भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी कंगना राणौत हिने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
तसेच, आशिष शेलार यांनी याबाबतची भाजपाची भूमिका स्पष्ट करत, संजय राऊत यांनी भाजपावर केलेल्या टीकेला देखील उत्तर दिले आहे.
“सुशातसिंग राजपूतच्या प्रकरणातून जेवढी वळणं, या चौकशीला वेगवेगळ्या दिशेनं नेता येईल तेवढा प्रयत्न, काही राजकीय मंडळी वारंवार करत आहेत. हे महाराष्ट्र व देश बघतो आहे. आजच ज्या पद्धतीचं वक्तव्य संजय राऊत यांनी केले. त्यावर आमची स्पष्ट भूमिका आम्ही मांडत आहोत. कंगना राणौत यांनी मुंबई, मुंबईकर व महाराष्ट्र यांना शहाणपण शिकवण्याची गरज नाही. त्यामुळे अशा पद्धतीने मुंबई, मुंबईकर व महाराष्ट्र यांना शहाणपण शिकवणारे कुठलेही वक्तव्य कंगना राणौत यांनी केले असेल किंवा केलेले आहे, त्याच्याशी भाजपाला जोडणे दुर्देवी व चुकीचे आहे. आम्ही कंगणना राणौत यांच्या वक्तव्याशी असहमत आहोत,” असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, संजय राऊत यांना देखील आमचे सांगणे आहे की, सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणामध्ये चौकशीतल्या गोष्टींचा विपर्यास किंवा दुसऱ्या दिशेने नेण्यासाठी कंगना रणौत यांच्या पाठीमागे राहून वार करण्याची गरज नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू असताना, कुठल्याही अशा पद्धतीच्या वक्तव्यावर वातावरण तापवण्यापासून सगळ्यांनी स्वतःला वाचवले पाहिजे, असेही आशिष शेलार यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्राच्या अस्मितेवर जी लोकं मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या पक्षाला लाज वाटली पाहिजे. त्या पक्षाला मुंबईत मतदान मागण्याचा अधिकार नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपावर निशाणा साधला. तसेच, मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्यांना पाठीशी घालणारे जे कोणी आहेत, त्यांना मुंबईत मतं मागताना लाज वाटली पाहिजे, तुम्हाला POK ने मतं दिली का?” असा सवाल संजय राऊत यांनी भाजपा आमदार राम कदम यांना केला आहे.