राज ठाकरेंच्या ‘बाप परत फिरकलाच नाही’ टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “हो, मी सांगितलं होतं की नाशिक.”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या अनुषंगाने नाशिकमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा पार पडली होती.
या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दत्तक घेतो बोलले, पण हा बाप परत फिरकलाच नाही’, असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला होता. दरम्यान राज ठाकरेंच्या या टीकेला आता फडणवीसांनी उत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज (रविवार) नाशिक येथे प्रचारसभा पार पडली. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली. “काल परवा दोन भाऊ येऊन गेले. नाशिकमध्ये आले पण रामाची आठवणच झाली नाही. नाशिकमध्ये येऊन ज्यांनी राम मांडला नाही आता त्यांच्यामध्ये राम उरला नाही. ‘और जो राम का नही वो किसी काम का नही’. अलीकडच्या काळात देव खरंच आहेत की नाही? असा प्रश्न काही लोकांना पडायला लागला. देवाची खिल्ली काही लोक उडवायला लागले. त्यांच्याबद्दल मी फार बोलणार नाही,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, “माझी खिल्ली उडवली गेली. म्हणाले नाशिक दत्तक घेतलं होतं त्याचं काय झालं? हो, मी सांगितलं होतं की मी नाशिक दत्तक घेतोय. मी त्यानंतर ही तक्रार नाही केली, की मी २०१७ साली नाशिक दत्तक घेतलं आणि २०१९ साली विरोधी पक्षाचा नेता झालो. दोनच वर्ष मला मिळाले. पण याची तक्रार मी केली नाही. कारण तक्रार करणारे लोक आम्ही नाहीत.”
“विरोधी पक्ष नेता म्हणून देखील जेव्हा कोव्हिडच्या काळात देखील उबाठा, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते घरी बसले होते, तेव्हा हा देवाभाऊ नाशिकमध्ये आला होता. या ठिकाणच्या प्रत्येक कोव्हिड केअर सेंटर आणि आयसीयूपर्यंत जाणारा हा देवाभाऊ होता. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही किती वेळा नाशिकला आले? मी तर वर्षातून चारदा नाशिकला येतो. पण तुम्ही किती वेळा आलात? निवडणुका आल्या की नाशिकला यायचं आणि निवडणुका संपल्या की नाशिकला विसरायचं अशा पद्धतीचे हे निवडणूक पर्यटक आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने पर्यटन करणारे हे लोक आहेत,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“काळजी करू नका, खऱ्या अर्थाने नाशिकशी माझं नातं तेच आहे. कालही होतं, आजही आहे आणि उद्याही राहील. कारण नाशिकची जबाबदारी आम्ही घेतली आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
“२०१२ मध्ये जेव्हा नाशिकच्या महापालिकेत माझी सत्ता होती आणि त्यानंतर २०१७ साली देवेंद्र फडणवीस आले आणि म्हणाले की मी नाशिकला दत्तक घेतो. त्यांच्या या गोष्टींना नाशिककर भुलले आणि आम्ही जी कामे करून ठेवली होती ते सगळे विसरले. देवेंद्र फडणवीस नाशिकला दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप परत फिरकलाच नाही. काय-काय गोष्टी करतो म्हणून सांगितल्या होत्या”, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..