“विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते”; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या शासकीय डिनरला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांना निमंत्रण न दिल्याने देशाच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे.
विरोधी पक्षनेत्यांना निमंत्रण न दिल्याबद्दल काँग्रेसने भाजपवर टीका केली असतानाच, याच मेजवानीला काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार शशी थरूर उपस्थित राहिल्याने पक्षांतर्गतही खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर थरूर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना, विरोधी पक्षनेत्यांना निमंत्रण देणे योग्य ठरले असते, असे मत व्यक्त केले आहे.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांना परराष्ट्र व्यवहार संसदीय समितीचे प्रमुख या नात्याने या मेजवानीसाठी निमंत्रण देण्यात आले होते. त्यांनी या वादावर भाष्य करताना गोष्टी स्पष्ट केल्या. “मी या वादात पडू इच्छित नाही. पण मला खात्री आहे की, आमच्यासारख्या लोकशाही देशात विरोधी पक्षनेते तेथे उपस्थित असू शकले असते. हे चांगले झाले असते,” असे थरूर म्हणाले.
“मी तेथे संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीचा अध्यक्ष या नात्याने उपस्थित होतो, आणि मला कबूल करावे लागेल की माझ्या काही चांगल्या चर्चा झाल्या, असेही शशी थरूर यांनी म्हटलं. थरूर यांनी पुढे स्पष्ट केले की, परदेशी राष्ट्राध्यक्ष किंवा सरकार प्रमुखांसाठी मेजवानी आयोजित करणे हा शिष्टाचार आहे. पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिलेली भाषणे अत्यंत चांगली आणि सौहार्दपूर्ण होती, असं थरूर म्हणाले.
काँग्रेसमध्येच नाराजी, थरूर यांचे स्पष्टीकरण
या मेजवानीला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना निमंत्रण नसताना थरूर उपस्थित राहिल्याबद्दल काँग्रेसच्या काही नेत्यांनी टीका केली होती. यावर थरूर यांनी आपल्या पक्षातील सहकाऱ्यांच्या टीकेला उत्तर दिले. “मला वाटते की त्यांनी (काँग्रेस नेत्यांनी) आपले मत व्यक्त केले आहे, आणि मला कोणत्याही वादात पडायचे नाही. त्यापैकी (काँग्रेसच्या) काही नेत्यांना निमंत्रण मिळाले नाही, याचे मला वाईट वाटते. असे घडणे लाजिरवाणे आहे,” असे थरूर म्हणाले.
काँग्रेसचा भाजपवर हल्ला
काँग्रेस खासदार सैयद नासिर हुसेन यांनी विरोधी पक्षनेत्यांना निमंत्रण न दिल्याबद्दल भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी भेदभाव न करण्याचे आवाहन केले. हुसेन यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, “दीर्घकाळ चाललेल्या लोकशाही परंपरेपासून दूर जात, भारताच्या राष्ट्रपतींनी संसदेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासाठी आयोजित सरकारी मेजवानीत निमंत्रण दिले नाही. देशाच्या संवैधानिक प्रमुख आणि यजमान या नात्याने, राष्ट्रपतींनी आपल्या पक्षाच्या पसंती आणि भेदभावापासून दूर राहावे आणि दोन्ही पक्षांमध्ये संवादाची परंपरा कायम राहील याची खात्री करावी.”
पुतिन यांच्यासाठी आयोजित कार्यक्रमातून विरोधी पक्षाच्या दोन प्रमुख नेत्यांना वगळल्यामुळे आणि त्यातही थरूर यांच्या उपस्थितीमुळे, हा वाद आता राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय बनला आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….