शिंदे गटाचा भाजपावर गंभीर आरोप; मातोश्रीवर पक्षप्रवेशाची लगबग, ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याची चर्चा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “शिंदे गटाचा भाजपावर गंभीर आरोप
निवडणूक आयोगाने काही जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीत पराभव लक्षात येताच निवडणूक आयोगाला हाताशी धरून २ डिसेंबर २०२५ रोजी होणारी निवडणूक रद्द करण्यात आली, असा आरोप शिंदेसेनेने भाजपावर केला आहे. निवडणूक पुढे ढकल्याने त्याचा मोठा त्रास हा उमेदवार व मतदार राजाला होणार आहे, त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाचा जाहीर निषेध करत आहोत, अशी बॅनरबाजी शिंदे गटाने अंबरनाथमध्ये केली आहे. मतदार राजा सुसंस्कृत व सुशिक्षित असून त्यांनादेखील निवडणूक पुढे ढकलण्याचे कारण लक्षात आले आहे. त्याचे उत्तर नागरिक येत्या २० तारखेला आपल्या मतदानातून नक्कीच देतील. असा मजकूरही फलकावर लिहिण्यात आला आहे. हा अप्रत्यक्ष भाजपावर हल्ला असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीत भाजपा विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा सामना रंगला आहे.
मातोश्रीवर शिवसैनिकांची लगबग
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना शिंदे गटातील अनेक पदाधिकारी ठाकरेंच्या सेनेत प्रवेश करीत आहेत. गेल्या दोन दिवसांत शिंदेंच्या १०० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची कास धरली आहे. त्यामुळे मातोश्रीवर पक्षप्रवेशांची लगबग दिसून येत असून कार्यकर्त्यांची गर्दी वाढत आहे. एकनाथ शिंदे यांचा गड मानल्या जाणाऱ्या ठाण्यातील उपविभाग प्रमुख आबा मोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर शिंदेंच्या कोपरी-पाचपाखडी मतदारसंघातील जवळपास १०० कार्यकर्ते ठाकरे गटात दाखल झाले आहेत. त्याशिवाय शिंदे गटाचे नवी मुंबईतील सहसंपर्क प्रमुख शिरीष पाटील यांनीदेखील आपल्या शेकडो समर्थकांसह मशाल हाती घेतली आहे. शिंदेंच्या सेनेत गेलेले आमचे अनेक नेते आणि पदाधिकारी आगामी काळात घरवापसी करतील, असा विश्वास ठाकरे गटातील नेत्यांनी व्यक्त केला आहे. मातोश्रींवर येणाऱ्यांसाठी चर्चेचे दरवाजे खुले झाल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याची चर्चा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि नेत्यांच्या पक्षांतराच्या मुद्द्यावरून राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे अचानक दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, त्यांच्या दिल्ली दौऱ्याचे कारण राजकीय नसून कौटुंबिक असल्याची माहिती मनसेच्या नेत्यांनी दिली आहे. राज यांची सून मिताली ठाकरे यांचे बंधू डॉ. राहुल बोरुडे यांचा ५ डिसेंबर रोजी दिल्लीत विवाह पार पडणार आहे. या सोहळ्याला ठाकरे कुटुंबातील सर्वच नातेवाईक उपस्थित राहणार आहेत. या विवाहसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुढील दोन दिवस दिल्लीमध्ये थांबणार आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील राजकीय घडामोडींची तापलेली पार्श्वभूमी असतानाच त्यांचा हा दौरा उत्सुकता निर्माण करणारा ठरणार आहे.
अंबादास दानवेंचे सरकारला चार महत्वाचे प्रश्न
पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणावरून अंबादास दानवेंनी महायुती सरकारला चार महत्वाचे प्रश्न विचारले आहेत. पुण्याच्या जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला अखेर अटक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे जी, या प्रश्नांची उत्तरे जनता मागते आहे, अशी पोस्ट दानवेंनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून केली आहे. जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल तर मग घेणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या पार्टनरला अटक का नाही? पार्थ पवार प्रकरणात कंपनीने उत्तर देण्यासाठी अजून किती दिवस ‘मुदतवाढ-मुदतवाढ’ खेळणार आहात? अमेडिया कंपनीत केवळ १ टक्का भागधारक दिग्विजय हा ९९ टक्के भागधारक असलेल्या पार्थ पवारांच्या मर्जीशिवाय सायनिंग अथॉरिटी झाला का? मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे सरकार कधी जाहीर करणार? ही शुल्क माफी राजकीय दबावाशिवाय होणे शक्य नाही महोदय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याची कल्पना नाही असे सांगणे, हे जनतेला शुद्ध वेडे बनवणे आहे. ते ही बहुमताच्या जोरावर, असा टीकाही दानवे यांनी पोस्टमधून केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांची महायुतीवर टीका
नगरपालिका निवडणुकांचा निकाल पुढे गेल्याने मतयंत्रांत घालमेल करण्याची संधी सरकारला मिळू शकते, अशी टीका माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील गोंधळ हा निवडणूक आयोगाच्या अक्षमतेचा जिवंत पुरावा आहे. आता निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन नगरपालिका निवडणुकांचा निकाल तीन तारखेऐवजी २१ तारखेला जाहीर होणार आहे. म्हणजेच १६-१७ दिवस मतयंत्रे शासकीय गोदामात पडून राहणार आहेत, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडे भाजप सरकारने केलेले दुर्लक्ष म्हणजे लोकशाही संपवण्याचा प्रयत्न असून, ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आहे. गेल्या दहा वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्याच नाहीत. पाच वर्षे प्रशासन नोकरशाहीकडे राहिले, त्यात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना कुठलाही अधिकार दिला गेला नाही. ७३ आणि ७४ व्या घटनादुरुस्तीने नागरिकांना वेळेवर निवडणूक होण्याचा घटनात्मक अधिकार दिला, पण तो अधिकार भाजपा सरकारने आपल्या राजकीय स्वार्थासाठी पायदळी तुडवल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….