आज अजित पवारांनी यायला हवं होतं, राज ठाकरे असं का म्हणाले? पत्रकार परिषदेत काय घडलं?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महाराष्ट्रात सध्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सातत्याने एकमेकांची भेट घेताना दिसत आहे.
यामुळे येत्या निवडणुकीत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र लढणार असल्याचे बोललं जात आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळासह मुख्य निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाची भेट घेऊन मतदार यादीतील घोळाबाबत तक्रार केली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे चर्चांना उधाण आले आहे.
निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी मतदार यादीतील घोळावर बोट ठेवला. तसेच हा घोळ सुधारण्याची मागणी केली. त्यानंतर राज ठाकरे यांना भविष्यातील युती आणि आघाडीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी मिश्किलपणे अजित पवारांचा उल्लेख केला.
अजित पवारांनी यायला हवं होतं?
तुम्ही महाविकास आघाडीसोबत युती करणार का या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले. मी २०१७ सोबत दिसलो होतो. आता निवडणूक कशी होणार हे महत्वाचं आहे. कुणाबरोबर होणार हा आताचा विषय नाही. २०१७ लाही मी तेच बोलत होतो. अजित पवारही त्यावेळी सोबत होते. त्यांनी यायला हवं होतं. त्यावेळी ते तावातावाने बोलत होते. सांगत होते सर्व गोष्टी,” असे राज ठाकरे म्हणाले.
निवडणूक यादीत घोळ आहे. यादीतील घोळ राज्य आणि निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधीसमोर ठेवले. ते सुधारावेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांचे समाधान झाले आहेत. जे निवडणूक लढवतात त्यांचं समाधान झालं पाहिजे. ही रास्त मागणी आहे. यात गोंधळ आणि संभ्रम असण्याचं काम नाही. क्लिष्ट काहीच नाही. याद्यातील घोळ समोर ठेवल्यावर त्यांनी आणि राजकीय पक्षांनी याद्या सुधारल्या पाहिजे. सुधारूनच पुढे गेलं पाहिजे, असे राज ठाकरेंनी म्हटले.
हल्लीच हे विषय का येतात?
२०२४ विधानसभा निवडणूक झाली. २३२ जागा महायुतीच्या आल्या. संपूर्ण महाराष्ट्रात एवढ्या जागा आल्यावरही सन्नाटा होता. ज्या प्रकारचा जल्लोष पाहिजे तो झालाच नाही. निवडून आलेल्यांनाही धक्का बसावा एवढा हा सन्नाटा होता. ही कोणती लोकशाही आहे. या देशात या पहिल्या निवडणुका नाहीये. याच्या आधी अनेक निवडणूका झाल्या. इतके वर्ष निवडणुका सुरू आहे. हल्लीच हे विषय का येत आहे. त्यापूर्वी येत नव्हते, असा सवालही राज ठाकरेंनी केला.