‘आनंदाच्या शिधा’नंतर एकनाथ शिंदेंची आणखी एक योजना बंद?; लाखो रुपयांची दिली होती पारितोषिके….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना’सुद्धा बंद करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
याआधी शिक्षण विभागातील स्वच्छता मॉनिटर, एक राज्य एक गणवेश, पुस्तकाला वह्यांची पान हे निर्णय सुद्धा मागे घेण्यात आले. एकाच शैक्षणिक वर्षात राबविण्यात आलेली ही योजना नोव्हेंबर उजाडला तरी राबवण्यात आलेली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आलेल्या आनंदाच्या शिधा या योजनेनंतर शिक्षण विभागातील माझी शाळा सुंदर शाळा ही योजना सध्या बंद करण्यात आल्याची माहिती आहे.
राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास करणे, त्यांचे आधुनिकीकरण आणि सौंदर्यीकरण करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ही योजना 5 डिसेंबर 2023 रोजी सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत 2023 शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळांमध्ये स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरावर स्पर्धा घेण्यात आल्या. लाखो रुपयांची पारितोषिके देण्यात आली. त्यामुळे राज्यातील शिक्षण संस्थांसह विद्यार्थी आणि पालकांमध्येही या योजनेची चर्चा होती. दोन टप्प्यांत ही योजना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. मात्र यंदा या योजनेला अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही.
अंबादास दानवेंचा टोला :-
एकनाथ शिंदेंची आणखी एक योजन बंद पडल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत टोला लगावला आहे. सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्याच सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्या आहेत. अमच्यातून गेलेले ‘कटप्रमुख’ मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना आपल्याला दिसतील, असं अंबादास दानवेंनी म्हटलं आहे.
१. आनंदाचा शिधा- बंद!
२. माझी सुंदर शाळा – बंद!
३. १ रुपयात पीकविमा – बंद!
४. स्वच्छता मॉनिटर – बंद!
५. १ राज्य १ गणवेश – बंद!
६. लाडक्या भावाला अपरेंटीसशिप – बंद!
७. योजनादूत योजना – बंद!
८. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना – बंद!
योजना बंद करणारे हे चालू सरकार आहे. निवडणुकांपुरत्या या सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे निश्चित मांडू, असं अंबादास दानवे म्हणाले.