शरद पवार भाकरी फिरवणार..? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा बदल, आर.आर. आबांच्या मुलाला मिळणार मोठी जबाबदारी….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले आणि राज्याचे गृहमंत्री म्हणून आपल्या कामगिरीचा न पुसला जाणारा ठसा उमटवणारे आर. आर. पाटील उर्फ आबा यांच्या मुलाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
शरद पवार यांच्याकडून लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करुन भाकरी फिरवली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी पक्षाच्या युवक प्रदेशच्या अध्यक्षपदी रोहित आबा पाटील यांची नियुक्ती केली जाऊ शकते. सध्या मेहबूब शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवकचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. मेहबूब शेख हेदेखील शरद पवार यांच्या मर्जीतील आणि ग्रामीण भागातील मतदारसंघांचा सखोल अभ्यास असणारे नेते म्हणून ओळखले जातात. मेहबूब शेख हेदेखील आक्रमक नेतृत्व शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, आता राष्ट्रवादी पक्षाच्या युवक प्रदेशच्या अध्यक्षपदाची धुरा हे तुलनेने संयत पण तळागाळातील लोकांशी थेट संवाद असलेल्या रोहित पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बैठकीमध्ये या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
कोण आहेत रोहित पाटील?
गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अवघे 10 आमदार निवडून आले. यामध्ये रोहित पाटील यांचा समावेश आहे. रोहित पाटील हे तासगाव-कवठेमहंकाळ मतदारसंघातून 1,26,478 मतं मिळवून विजयी झाले. त्यांनी संजयकाका पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा पराभव केला होता. रोहित पवार हे अवघ्या 25 वर्षांचे असून ते देशातील सर्वात तरुण आमदार ठरले होते. रोहित पाटील हे राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर.आर. पाटील यांचे सुपुत्र आहेत. रोहित पवार हे कायद्याचे पदवीधर आहेत. आर.आर. पाटील यांच्याप्रमाणे समाजातील तळागाळातील लोकांशी थेट संवाद साधण्याची हातोटी आणि लोकांमध्ये मिसळण्याची वृत्ती हे रोहित पवार यांचे बलस्थान आहे. गेल्या काही वर्षांमध्ये रोहित पाटील हे आश्वासक तरुण नेतृत्व म्हणून झपाट्याने प्रगती करत आहेत.
अजितदादा गटाकडून धाराशिवच्या जिल्हा संपर्कमंत्री पदावर दत्तात्रय भरणेंची नियुक्ती
राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते दत्तामामा भरणे यांची धाराशिव जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या दृष्टीने पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी भरणे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.