अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राकडे अजून प्रस्तावच नाही; दिवाळीपूर्वी मदत कशी मिळणार?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “अतिवृष्टीमुळे राज्यातील जवळपास 50 लाख हेक्टरपेक्षा जास्त कृषी क्षेत्र प्रभावित झाले आहे. अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यातील भाजप महायुती सरकारकडून आश्वासन दिले जात आहे.
केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन मदतीसाठी पत्र दिले होते. हे पत्र देताच केंद्राकडून मदत मिळणार, असे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जाऊ लागले.
परंतु आता केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यात राज्य सरकारने मदतीचा प्रस्ताव पाठवल्यानंतर अतिवृष्टीग्रस्तांना केंद्राकडून तातडीने मदत पाठवली जाईल, असे सांगितले.
अमित शहा यांच्या या विधानामुळे राज्य सरकारचा केंद्राकडे अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी अजूनही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट झाले. हा प्रस्ताव कधी जाणार? दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार का? असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
राज्याला अतिवृष्टीचा चांगलाच तडाखा बसला आहे. मोठं नुकसान झालं आहे. एकूण नुकसानीचा आकडा अजून समोर आलेला नाही. परंतु अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान मोठं आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या (Farmer) जमिनी खरडून निघून गेल्या आहेत.
त्यामुळे पुढील तीन ते चार वर्षे शेतकरी यातून उभा राहू शकत नाही, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यातच आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. राज्यातील भाजप महायुतीने केंद्रातकडे अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी अजूनही प्रस्ताव पाठवलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्तांना मदत देणार, असे देत असलेल्या आश्वासनाची पूर्तता होईल का? अशी चर्चा आहे.
अतिवृष्टीचा तडाखा बसत असताना, केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर होते. तिथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेत, अतिवृष्टीग्रस्तांसंदर्भात निवेदन दिले होते. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील 50 लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती विभागातून मदत मिळावी, अशी निवेदनाद्वारे मागणी केली.