” महाराष्ट्र सांभाळता येत नाही आणि चालले देशातील दुसरी राज्यं सांभाळायला “
उद्धव ठाकरेंची राष्ट्रीय नेतृत्त्वाची मानसिकता असल्याचं संजय राऊत यांचं वक्तव्य
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
भाजपा खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सांभाळता येत नाही आणि देशातील दुसरी राज्य सांभाळायला चालले आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे. नारायण राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा टोला लगावला आहे. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राष्ट्रीय नेतृत्त्वाची मानसिकता असल्याचं म्हटलं होतं. त्यावरुनच नारायण राणे यांनी ही टीका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राष्ट्रीय नेतृत्त्वाची मानसिकता आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीत केंद्र सरकारला घाबरायचं की विरोधात लढायचं हे ठरवा असं सांगितलं होतं. संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राने आता राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवायला पाहिजे असं म्हटलं.
“उद्धव ठाकरे कधीही आडपडदा ठेवून बोलत नाही. पोटात एक आणि ओठावर दुसरं असं कधीच नसतं. उद्धव ठाकरेंनी केंद्राविरोधात लढण्याची तयारी करताना बिगरभाजप राज्यांना आवाहन केलं आहे. या सगळ्यांचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय स्तरावर करावं असं माझं मत आहे. उद्धव ठाकरेंची राष्ट्रीय नेतृत्त्वाची मानसिकता होताना मला दिसत आहे,” असं संजय राऊत यांनी सांगितलं होतं.
फडणवीस उत्तम विरोधीपक्ष नेता
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होणाऱ्या टीकेवर बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं होतं की, “फडणवीस यांनी मत मांडलं आहे. मतभिन्नता असू शकते. त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे जी लोकांपर्यंत पोहोचली आहे. या देशात त्यांच्याइतका सक्षम विरोधीपक्ष नेता पाहिलेला नाही. इतिहासात त्यांचं नाव उत्तम विरोधीपक्ष नेता म्हणून लिहिलं जाईल याची खात्री आहे”.