“ओला दुष्काळ जाहीर करता येणार नाही”, मुख्यमंत्र्यांनीच केलं स्पष्ट; पण मदत करणार, कशी? म्हणाले….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मराठवाड्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झालं आहे. लोकांच्या घरांचं, पिकांचं नुकसान पाहून शेतकऱ्यांसमोर आता जगायचं कसं? असा प्रश्न उभा राहिला आहे.
हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. अशा स्थितीत शेतकरी व विरोधक राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सातत्याने करत आहेत. मुसळधार पावसामुळे व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज (३० सप्टेंबर) पार पडली.
मंत्रिमंडळ बैठकीत सरकार शेतकऱ्यांसाठी व नुकसानग्रस्तांसाठी काय निर्णय घेतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. सरकार ओला दुष्काळ जाहीर करतंय का याकडेही सर्वांचं लक्ष होतं. दरम्यान, राज्य सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही. मात्र, दुष्काळ पडल्यानंतर जशा सवलती दिल्या जातात तशाच सवलती देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली आहे. दरम्यान, २२,११५ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून ती मदत वितरीत केली जात असल्याचं फडणवीस यांनी जाहीर केलं आहे.
ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही?
मुख्यमंत्री म्हणाले, “ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सातत्याने होत आहे. यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे की आपण शेतकऱ्यांना व नुकसानग्रस्तांना सर्व सवलती देऊ. कारण नियमांमध्ये ओला दुष्काळ असं काहीच नाहीये. आजवर कधीही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. तथापि आम्ही निर्णय घेतला आहे की दुष्काळ पडतो तेव्हा ज्या उपाययोजना राबवल्या जातात, तेव्हा ज्या सवलती दिल्या जातात त्या सर्व सवलती यावेळी देखील देणार आहोत. राज्यात दुष्काळामुळे टंचाई निर्माण झाली आहे असं समजून सर्व सवलती लागू करत आहोत. ओला दुष्काळ जाहीर करण्याचा तसाच अर्थ असतो.”
६० लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान, २,२१५ कोटींची मदत वितरीत करण्यास सुरुवात
मुख्यमंत्री म्हणाले, “अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. आम्ही या नुकसानाचा आढावा घेतला. तब्बल ६० लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. पहिल्या टप्प्यात जे नुकसान झालं होतं. म्हणजेच ऑगस्टपर्यंत जे नुकसान झालं होतं त्याची भरपाई देण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी २,२१५ कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत. या मदतीचं वितरण सुरू झालं आहे. तसेच ही मदत करत असताना ई-केवायसीची अट शिथील करण्यात आली आहे. यासंदर्भातील सर्व माहिती पुढील दोन तीन दिवसांत सर्वांपर्यंत पोहोचेल. काही ठिकाणी अजूनही पाणी साठलं आहे. त्यामुळे पंचनामे करण्यास दोन तीन दिवसांची मुदत वाढवून दिली आहे.