स्वयंपुनर्विकास प्राधिकरण अध्यक्षपदी आ. प्रवीण दरेकर…

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यातील स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आ. प्रवीण दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या पदाला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला असून याबाबतचा शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला.
२०१९ मध्ये शासनाने स्वयंपुनर्विकास प्रकल्पांना विविध सवलती दिल्या. मात्र, त्यांची अंमलबजावणी झाली नव्हती. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या परिषदांच्या मागण्यांवर उपाय शोधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दरेकरांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन केला. या अभ्यासगटाने शासनाला प्राधिकरण स्थापन करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल दरेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
राज्यातील विशेषतः मुंबई उपनगरे, पुणे, नाशिक व नवी मुंबईतील स्वयंपुनर्विकासाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. प्राधिकरणामुळे येथे सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळवून देणे शक्य होणार आहे. शासनाने मोठी जबाबदारी दिली असून, स्वयंपुनर्विकास क्षेत्रात मोठे काम झाल्याचे आगामी काळात दिसून येईल, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष आ. दरेकर यांची नियुक्ती पुढील शासन आदेश होईपर्यंत करण्यात येत आहे. मंत्रीपदाच्या दर्जासाठी देण्यात येणारे भत्ते व सुविधा तसेच त्यांच्या कार्यालयासाठी जागा, आवश्यक कर्मचाऱ्यांची नेमणूक, त्यांचे भत्ते हे म्हाडा प्राधिकरणातर्फे देण्यात यावे, असे शासन निर्णयात म्हटले आहे.