“आदिवासी कवचयुक्त आरक्षणावर घाला ; पुसद मध्ये उद्या भव्य उलगुलान मोर्चा..!”

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- “आदिवासींना अनुसूचित जमातीचे आरक्षण हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधानिक कवच-कुंडल आहे. मात्र, राज्य शासनाने या कवच-कुंडलाला तडा देण्याचा प्रयत्न केला आहे, आणि त्यात बरीच भर म्हणून इतर जातीची घुसखोरी हे आदिवासी समाजावर अन्यायकारकच भूमिका होईल” अशी तीव्र भूमिका आदिवासी समाजाने घेतली असल्याने त्याचा तीव्र बिमोड करण्यासाठी सदर आदिवासी आरक्षण उल्कुलान मोर्चाचे आयोजन केले असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून आयोजकांच्या वतीने देण्यात आली
आदिवासींच्या नोकऱ्यांमधील जागा गैर-आदिवासींनी बळकावल्या असून सुप्रीम कोर्टाने घुसखोरांना बाहेर काढण्याचे आदेश दिल्यानंतरही राज्य शासनाने त्याची अंमलबजावणी न करता उलट अन्यायच केला आहे. त्यामुळे आदिवासी समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व, सामाजिक तसेच शैक्षणिक प्रगती मोठ्या प्रमाणात खुंटली आहे.
आदिवासी मंत्र्यांचा निषेध
दरम्यान, राज्याचे आदिवासी विकास मंत्री व पुसदचे रहिवासी इंद्रनील नाईक यांनी “बंजारा समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट करावे, अन्यथा राजीनामा देईन” असे विधान केल्याने आदिवासी समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
“एक आदिवासी मंत्री असूनही आपल्या संविधानिक जबाबदाऱ्या सोडून इतर समाजाच्या घुसखोरीला पाठिंबा देत आहेत आणि त्यासाठी राजीनाम्याची धमकी देत आहेत,” असा आरोप करत आदिवासी समाजाने इंद्रनील नाईक यांच्या भूमिकेचा जाहीर निषेध नोंदवला.
मोर्चाला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद
आदिवासी आरक्षण जाण्याच्या भीतीने गाव-खेड्यांतील वाड्यावस्त्यांमधील लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत. आयोजकांच्या मते, अर्धा लाखाहून अधिक मोर्चेकरांचा सहभाग अपेक्षित आहे. संविधानावरील हा हल्ला असल्याने संविधानप्रेमींची साथही मोठ्या प्रमाणात लाभणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
मोर्चातील लक्षवेधक बाबी
‘संविधान बचाव – आदिवासी आरक्षण बचाव’ अशा घोषणांचे शेकडो बॅनर, निळे आणि पिवळे झेंडे, महामानवांच्या घोषणा आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे पारंपरिक नृत्य या सर्वामुळे हा मोर्चा विशेष ठरणार आहे. आयोजकांनी विश्वास व्यक्त केला की, हा लक्षवेधी उलगुलान मोर्चा राज्य शासनासह केंद्र शासनाचे डोळे उघडेल.
मोर्चा मार्ग :-
30 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता सदर मोर्चाची सुरुवात जुनी जिनिंग प्रेसिज (जुने ए.आर. ऑफिस) पासून होऊन महात्मा फुले चौक मार्गे सदर मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून मुखरे चौक मार्गाने तहसील पासून यशवंत रंग मंदिरात मोर्चाचे सभेत रूपांतरित होणार. यावेळी आदिवासी समाजाचे तडफदार आदिवासी युवा नेते सतीशदादा पेंदाम ,श्री संभाजी सरकुंडे (माजी आयुक्त),आमदार भीमराव केराम, आमदार सुनील भाऊ भुसारा, ॲड प्रशांत बोडखे श्री सतीश पाचपुते लकी भाऊ जाधव यांच्यासह मान्यवर मंडळी मोर्चेकऱ्यांना संबोधित करणार आहेत. आणि पुढील आंदोलनाची आणि पवित्र याची दिशा ठरवणार आहे.अशी माहिती आयोजक सकल आदिवासी समाज पुसद यांच्यावतीने आज दुपारी चार वाजता विश्रामगृह पुसद येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आले यावेळी सकल आदिवासी समाजाचे समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.