10 हजार पदांसाठी एकाच दिवशी मेगा भरती; अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीपत्रे वाटप केली जाणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “गेल्या काही वर्षांपासून अनुकंपा तत्त्वावर नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि विविध विभागांतील लिपिकांच्या रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच सुमारे 10,000 बेरोजगारांना एकाचवेळी नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत.
मुंबईत एका भव्य सोहळ्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत संबंधित जिल्ह्यांतील पात्र उमेदवारांना नोकरीची पत्रव्यवस्था केली जाणार आहे, असे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.
शासकीय किंवा निमशासकीय संस्थेत सेवेत असताना कर्मचाऱ्यांचे निधन झाल्यास त्यांच्या वारसाला त्या विभागात नोकरी देण्याचे अनुकंपा तत्त्व 1976 पासून राज्यात राबविले जात आहे. या धोरणानुसार गट क आणि ड कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी अनुकंपा तत्त्वावर नोकरीची सुविधा आहे.
गेल्या काही वर्षांपासून राज्यातील अनुकंपा नियुक्त्या रखडल्या होत्या. तब्बल 9,658 उमेदवार या नोकरीसाठी प्रतीक्षेत आहेत. त्यापैकी सर्वाधिक 506 उमेदवार नांदेड जिल्ह्यात, पुण्यात 348, गडचिरोलीत 322 तर नागपूर जिल्ह्यात 320 उमेदवार आहेत.
राज्याच्या विविध विभागांमध्ये 5,228, महापालिका व नगरपालिकांमध्ये 725 तर जिल्हा परिषदांमध्ये 3,705 उमेदवारांची अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती रखडलेली होती. या सर्व जागा भरण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने 17 जुलैच्या बैठकीत घेतला. या निर्णयानुसार मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना अर्ज करण्याची मुदत वाढवून एक वर्षाऐवजी तीन वर्षांपर्यंत करण्यात आली आहे.
अनुकंपा तत्त्वासाठी वयोमर्यादा 45 वर्षे असून, यानंतर उमेदवाराचे नाव प्रतीक्षापत्रिकेतून काढले जात असे. आता जर एखाद्या उमेदवाराला 45 वर्षांपर्यंत नोकरी मिळाली नाही, तर त्या कुटुंबातील अन्य व्यक्तीस हक्क दिला जाईल. पूर्वी प्रतिक्षा यादीतील उमेदवाराचे नाव बदलता येत नव्हते, आता कुटुंबातील दुसऱ्या उमेदवाराचे नाव बदलता येईल. तसेच, तीन वर्षांत अर्ज न करता आलेल्या कुटुंबाला दोन वर्षांपर्यंत विलंब क्षमापणाचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
या निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्यभर अनुकंपा भरती मोहीम राबविण्यात आली असून, त्यात 5,187 उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून 5,122 उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एकूण 10,309 उमेदवारांना एकाचवेळी नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.
मुख्य कार्यक्रम मुंबईत होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते तर जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांच्या हस्ते पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर हा कार्यक्रम होणार होता, पण मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे आता कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..