OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी..?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “ऐन गणपतीत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत ठाण मांडले होते. आझाद मैदानावर येऊन हजारो आंदोलकांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला. यानंतर सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या बहुतांश मागण्या पूर्ण करत जीआर काढले.
परंतु, या जीआरला ओबीसी आंदोलकांनी तीव्र विरोध दर्शवला. यानंतर आता ओबीसी समाजाचे आरक्षण टिकण्यासाठी राज्यभरात आंदोलने केली जात आहेत.
२८ तारखेला बीडमध्ये आमची रॅली आणि सभा होणार आहे. प्रकाश शेंडगे, धनंजय मुंडे यांच्यासह काही जण येणार आहेत. ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत. आम्ही त्यात विजय मिळवणार, अनेक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. जिथे जिथे शक्य आहे तिथे आम्ही सभा घेऊ. या लढाईत मागासवर्गीय समाजाचा आम्हाला पाठिंबा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाचे संरक्षण आम्हाला करायचे आहे, असा एल्गार छगन भुजबळांनी केला. परंतु, या सर्व घडामोडीत नाना पटोले कुठे दिसले नाहीत, याबाबत राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू झाली आहे.
ओबीसी आंदोलनात नाना पटोले कुठे?
राज्यात ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना काँग्रेसचे महाराष्ट्रातील आक्रमक नेते आणि पक्षाचे माजी अध्यक्ष नाना पटोले यामध्ये कुठे आहेत, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. गेल्या २१ सप्टेंबरला गोंदियात ओबीसींचे मोठे आंदोलन झाले. ते पटोले यांच्या जिल्ह्यात होते; पण तिथेही ते दिसले नाहीत. राज्यात जिथे जिथे आंदोलने पेटली तिथे काँग्रेसचे लहान-मोठे नेते, धाव घेताहेत; पण नानाभाऊ अदृश्य असतात. पक्षाध्यक्ष पदावरून दूर झाल्यानंतरचा त्यांचा हा मूक निषेध की नव्या ‘योजने’ची त्यांची तयारी आहे? हे सारेच गुलदस्त्यात आहे; पण त्यांची ही गैरहजेरी कार्यकर्त्यांना नक्कीच खटकणारी असेल.
दरम्यान, सरकारने स्थापन केलेल्या ओबीसी आरक्षणासंदर्भातील उपसमितीमध्ये छगन भुजबळ सदस्य आहेत. सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल काढलेल्या जीआरनंतर छगन भुजबळ नाराज असल्याचे सांगितले जाते.